सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत असतानाही पोलिसांच्या कृत्याने रहीवाशांत संताप
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com –
नवी मुंबई : : सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ऑनलाईन पध्दतीने जीवनावश्यक वस्तू एका गृहनिर्माण सोसायटीने डीमार्टमधून मागवून त्याचे वितरण सुरूच होते. यावेळी नेरूळ पोलिसांनी येवून डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना मुजोरी दाखवित डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली व स्थानिक रहीवाशांशी उध्दट वर्तन केले. नेरूळ सेक्टर ४ मधील पामबीच मार्गालगतच्या अमेय सोसायटी (वाधवा टॉवर) येथे ही घटना घडली. रहीवाशांमध्ये या घटनेने संताप पसरला असून डीमार्टचे कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मारलेच का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जावू लागला आहे.
नेरुळ सेक्टर ४ मधील अमेय सोसायटीमधील रहीवाशांनी एकत्र येत डीमार्ट मधून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा मागितला होता. डीमार्टचा टेम्पो सामान घेऊन सोसायटी आवारात आला असता सामान उतरवतेवेळी नेरूळ पोलिसांनी त्यांना मारहाण केली. सोसायटीचे रहीवाशी बाहेर न जाता सोसायटी आवारातच सोशल डिस्टनसिंग ठेवत सामान खरेदी करत असताना पोलिसांनी ही हाणामारी केली. पोलिसांचे कृत्य सोसायटीच्या सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. सदर घटनेमुळे पोलिसांप्रति स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
· पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी
कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू भेटत नाही. त्यातच पोलिसांनी त्यांना मारहाण केल्यामुळे डीमार्टचे कामगार परत न आल्यास त्यास जबाबदार कोण असणार? रहीवाशांना झालेल्या मानसिक त्रासाला जबाबदार कोण? स्वत:च्याच सोसायटी आवारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नियमाचे पालन करणाऱ्या रहीवाशांची काय चुक होती? असे विविध प्रश्न उपस्थित करत नवी मुंबई इंटकच अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.