अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पावसाळा आता जवळ आला असल्याने प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए व १८ मधील वृक्षांच्या धोकादायक फांद्याची छाटणी करण्याची व नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीची लेखी मागणी भाजप नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
भागातील नेरूळ सेक्टर १६, १६ ए व १८ या परिसरात वृक्षछाटणी होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या ठिसूळ झाल्या आहेत. त्या पडण्याची शक्यता आहे. पावसाळ्याअगोदर जोराचा वारा आल्यास त्या फांद्या खाली पडून झाडाखालून ये-जा करणाऱ्या रहीवाशांना इजा करू शकतात अथवा रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांचे नुकसान करू शकतात. धोकादायक फांद्यामुळे जिवित अथवा वित्त हानी होण्याअगोदर परिसरात लवकरात लवकर वृक्षछाटणी अभियान राबविणे गरजेचे असल्याचे नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रभागातील नेरूळ सेक्टर १६, १६ ए व १८ या परिसरात पथदिव्यांची अवस्था काही ठिकाणी दयनीय झालेली आहे. काही ठिकाणी पथदिवे नादुरुस्त अवस्थेत बंदच आहेत. काही पथदिव्यांच्या बाहेर वायरी आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व पथदिव्यांची तपासणी व दुरूस्ती होणे आवश्यक आहे. पाऊस सुरू झाल्यावर पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती होणे अवघड आहे. विद्युत केबल्स उघड्यावर असल्याने शॉक लागून जिवितहानी होण्याचीही भीती आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रभागामध्ये नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीसाठी व धोकादायक फांद्यांच्या छाटणीसाठी विशेष अभियान राबविण्याची मागणी नगरसेविका भगत यांनी केली आहे.