भास्कर जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गावातील महापालिका शाळेत बनविण्यात आलेल्या निवारा केंद्रात असलेल्या मजुरांची कोरोना चाचणी करण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
कोरोना काळात नवी मुंबई कार्यक्षेत्रातील बेरोजगार मजुर, बेघर यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने ठिकठिकाणी निवारा केंद्र बनविले असून त्यात त्यांना निवासाची सोय व दोन वेळचे जेवण आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही खरोखरीच अभिनंदनाची व स्तुत्य बाब आहे. सारसोळे गावातील महापालिका शाळा क्रमांक १२ येथे निवारा केंद्र बनविण्यात आले असून त्या ठिकाणी मजुर ठेवण्यात आले आहेत. मजुर एकत्र वास्तव्य करत असुन सारसोळे गावातील ग्रामस्थांची विविध कारणास्तव शाळेत व शाळेच्या परिसरातून ये-जा असते. निवारा केंद्रात असलेल्या मजुरांची महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर कोरोना चाचनी करून घेणे आवश्यक असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे
या मजुरांपैकी कोणा एकाला जरी कोरोनाची लागण झाल्यास निवारा केंद्रातीळ सर्वानाच लागण होण्याची भीती आहे. या शाळेच्या बाजुलाच सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा असल्याने याची फार मोठी किमंत सारसोळेच्या ग्रामस्थांना व रहीवाशांना चुकवावी लागण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता व कोरोनाविषयी जनसामान्यांमध्येअसलेली भीती पाहून लवकरात लवकर निवारा केंद्रातील मजुरांची कोरोना चाचणी करून घेण्याची मागणी मनोज मेहर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.ा