भास्कर जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून बनविण्यात आलेल्या निवारा केंद्रातील नाका कामगार व मजुरांना त्यांच्या गावी जाण्याकरिता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने व्यवस्था करण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नाका कामगारांची व मजुरांची पालिका शाळेमध्ये तसेच अन्यत्र अशा १८ ठिकाणी बनविण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवारा केंद्रामध्ये महापालिका प्रशासन सध्या १८५० व्यक्तिंची व्यवस्था करत असून त्यांना भोजन व निवास सुविधा देत आहे. याशिवाय ३३ हजार ९१८ व्यक्तिंना दररोज जेवण सुविधा देत आहे. सध्या परराज्यातील अथवा अंर्तगत राज्यामध्ये जे मजुर, कामगार आहेत, त्यांना सरकारच्या वतीने जाण्याची परवानगी व जाण्याकरिता सुविधाही दिलेली आहे. महापालिका प्रशासनाने निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची सोय लवकरात लवकर करून द्यावी. जेणेकरून निवारा केंद्र सांभाळण्याचा महापालिका प्रशासनावरील ताण कमी होईल. येथील कर्मचारी वर्ग अन्य कामासाठी वळविण्यात येईल. कोरोना इतक्यात आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मात्र शाळा आता महिन्यात सुरू होतील. शाळांमध्ये निवारा केंद्र चालविणे अवघड होईल. त्यामुळे निवारा केंद्रातील मजुरांना लवकरात लवकर पालिका प्रशासनाने त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.