रक्तदानाला महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती
घाटकोपर ( निलेश मोरे ): देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदात्याना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण , रेवदंडा , अलिबाग यांच्या वतीने वरळीतील ललित कला भवन , जांबोरी मैदान येथे 1 जून 2020 ते 2 जून 2020 पर्यंत दोन दिवसाचे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सोमवार दिनांक 1 जून रोजी सकाळी 10 ते सांय 4 पर्यंत आयोजित शिबिरात प्रतिष्ठाणच्या 323 श्रीसदस्यांनी रक्तदान केले. या शिबिराला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत , नगरसेवक अरविंद भोसले हे उपस्थित होते. यावेळी रक्तदान करताना गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्स व इतर खबरदारी श्री सदस्यांनी पार पाडली. राज्यात अनेक ठिकाणी जेथे जेथे रक्ताचा पुरवठा कमी आहे तिथे डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या वतीने रक्तदान शिबिर होणार असल्याचे श्री सदस्यांनी सांगितले.