औपचारिक परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिका आयुक्त यांना पत्र
मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे किंवा इतर आजारांनी मरण पावलेल्या व्यक्तीचे काही कारणामुळे होऊ न शकलेले अंत्यसंस्कार करण्याच्या मदतकार्यात पुढाकार घेण्याची तयारी मुंबई भाजपाचे सरचिटणीस आणि मोहित भारतीय फाउंडेशनचे संस्थेचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी दर्शवली आहे. त्यासाठी मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्र देऊन औपचारिक परवानगी देण्याची विनंती केली आहे.
महापालिका आयुक्त यांना लिहिलेल्या पत्रात श्री. भारतीय म्हणाले की, कोरोना संक्रमणामुळे बळी पडलेल्या शेकडो व्यक्तींचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पुढे येत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून मुंबईतील शवागारात मृतदेहाचे ढीग पडून आहेत. अशा मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याच्या कामी लागणाऱ्या वस्तू देत मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी संस्थेने दर्शवली आहे.
” कोविडच्या जागतिक महामारीच्या संक्रमण काळात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीबरोबर इतर आजारांमुळे मरण पावलेल्या व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक भीतीपोटी शवागाराकडे फिरकत नसल्याचे कळते. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारांची अतिरिक्त जबाबदारी पर्यायाने महापालिका आणि मुंबई पोलिसांना घ्यावी लागत आहे. महाराष्ट्राचे नागरिक म्हणून या संकटाच्या वेळी मदतीचा हात देणे हे संस्था कर्तव्य समजते. याहेतूने, ज्या मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक काही कारणास्तव पुढे येऊ शकले नाहीत, अशा पार्थिवाचे सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी फॉउंडेशनने घेण्याचे ठरविले आहे “असे भारतीय यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाल्यास फाउंडेशनच्यावतीने मृतदेह शवागारातून उचलण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करेल. रुग्णालयाच्या शवागारातून स्मशानभूमीत नेण्यात येईल आणि तेथे प्रत्येक पार्थिवावर पूर्ण सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येईल., असे पत्रात नमूद केले आहे.