चार दिवस उलटूनही गाळ उचलण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
निलेश मोरे
मुंबई : पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई महापालिकेकडून नाले, गटारे साफ केली जातात. यंदा देशात कोरोनाचे सावट असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरू नये यासाठी पालिकेची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. शौचालयाचे सॅनिटायझर , साठलेला ओला व सुका कचऱ्याचे विघटन , नाले सफाई पालिकेकडून केली जात आहे. मात्र काही झोपडपट्टी असलेल्या ठिकाणी पालिकेकडून करण्यात आलेल्या नाले सफाईतील गाळ आठवडा उलटूनही असाच पडून राहत असल्याने परिसरातील नागरिकाना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्यांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची भीती आता स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घाटकोपर येथे एन वार्ड पालिकेकडून माधव बाग , जगदुशा नगर , जय महाराष्ट्र प्रगती मंडळ येथे नाले सफाई करण्यात आली आहे. या नाल्यातील ओला गाळ असाच रस्त्यावर पडून आहे. चार दिवसांपासून हा गाळ उचलण्यात आला नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सध्या मुंबईत पावसाचे सावट असल्याचे चित्र दिसते आहे. वरुणराजा आगमनाची केव्हाही सुरुवात करू शकतो पालिकेने लवकरात लवकर हा गाळ उचलून रस्ता स्वच्छ करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.