भास्कर जाधव
नवी मुंबई : पाऊस सुरू होवून तीन दिवस झाले तरी प्रभाग ७६ मध्ये पावसाळीपूर्व कामांना नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अजून सुरुवात केलेली नाही. त्यामुळे साथीच्या आजाराचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळीपूर्व कामातंर्गत प्रभाग ७६ मधील वृक्षछाटणी आणि गटारातील तळापासून माती, तुंबलेला कचरा लवकरात लवकर काढण्याची मागणी सानपाडा येथील भाजप कार्यकर्ते व समाजसेवक पाडूंरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पाऊसाला सुरूवात झालेली आहे. कोरोना महामारीमुळे महापालिका प्रशासनाला नागरी सुविधा देताना आणि नागरी समस्या सोडविताना खूपच तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळीपूर्व कामांचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील अधिकांश प्रभागात वृक्षछाटणी आणि गटारातील तळापासून माती, तुंबलेला कचरा काढण्यास सुरूवात झालेली आहे. पण सानपाडा प्रभाग ७६ मध्ये या कामांना अद्यापि महापालिकेने सुरुवात न केल्याने हा प्रभाग महापालिकेने वगळला की काय, अथवा या प्रभागातून महापालिकेला कराचा भरणा होत नाही काय, असा संभ्रम निर्माण होवून स्थानिक जनतेकडून संतापही व्यक्त होवू लागला असल्याचे समाजसेवक पाडूंरंग आमले यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
कोरोना महामारीचा नवी मुंबईकर गेल्या तीन महिन्यापासून सामना करत आहेत. त्यात आता पाऊसाळा सुरू झाल्याने ताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींच्या आजाराचाही नवी मुंबईकरांना नव्याने सामना करावा लागणार आहे. गटारातील माती व तुंबलेला कचरा तळापासून न काढल्यास संततधार पाऊसात गटारे चोकअप होवून रस्ते जलमय होण्याची भीती आहे. यामुळे साथीच्या आजारांना खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच वृ वृक्षछाटणी मोहीम अजून प्रभाग ७६ मध्ये राबविण्यात न आल्याने वाऱ्यामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्या कोसळून जिवितहानी व वित्तहानीही होवू शकते. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचीही हानी होवू शकते, अशी भीती समाजसेवक पाडूंरंग आमले यांनी व्यक्त केली आहे.
समस्या गंभीर आहे, प्रभाग ७६ मध्ये अजूनही पावसाळीपूर्व कामांना पावसाळा सुरू झाल्यावरही सुरूवात न झाल्याने स्थानिक रहीवाशांमध्ये पालिका प्रशासनाप्रती जाहिरपणे संताप व्यक्त केला जावू लागला आहे. कराचा भरणा करूनही सुविधा मिळत नसल्याची नाराजी रहीवाशी व्यक्त करत आहे. पावसाळीपूर्व कामांना अजून विलंब झाल्यास प्रभाग ७६ मध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक होवून पालिकेकडून कामांना विलंब झाल्याची किमंत स्थानिक रहीवाशांना मोजावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रभाग ७६ मध्ये वृक्षछाटणी आणि गटारातील तळापासून माती, तुंबलेला कचरा लवकरात लवकर काढणेबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्याची मागणी समाजसेवक पाडूंरंग आमले यांनी निवेदनातून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.