नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोना नियंत्रित आणण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वपक्षीय बैठकीत घेतलेल्या आढावा बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, बेलापूर विधानसभेतील भाजप आमदार मंदाताई म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, काँग्रेस प्रदेश चिटणीस संतोष शेट्टी, जिल्हा प्रवक्ता रवींद्र सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, माजी नगरसेवक राजू शिंदे आदी उपस्थित होते. मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आरोग्यविषयक बाबींची माहिती यावेळी दिली.
वाशी सिडको प्रदर्शन केंद्र येथील विशेष कोविड हॉस्पिटल ९ जून रोजी रुग्ण सेवेत रुजू होणार असून या रूग्णालयात असणाऱ्या सुविधांबाबत माहिती या आढावा बैठकीत देण्यात आली. पालकमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून सुचना ऐकून घेतल्या. या सूचनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आले. पुढील काळात वाशी येथील रुग्णांना सुविधा मिळाव्या म्हणून महाविकास आघाडीमधील घटकांच्या प्रयत्नाने १२०० बेडस असलेले सुसज्ज प्राणवायू व्यवस्था असणारे रुग्णालय ९ जून रोजी सुरू होत आहे. सध्याच्या कोविड हॉस्पिटल मध्ये सुरू होणाऱ्या लॅब मध्ये २०० रुग्णांची चाचणी दरदिवशी करण्याची क्षमता असणार आहे. यामुळे आता रुग्णांचा अहवाल येण्यास होणार विलंब टळणार आहे. या सर्व सुविधा महाविकास आघाडीच्या प्रयत्नाने होत असल्याने विरोधकांनी उंटावरून शेळ्या हाकून विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. यात राजकारण करून चांगल्या उपक्रमात खो घालुन नवी मुंबई शहरातील जनतेच्या अडचणी वाढवू नये. शहराच्या भविष्यासाठी एकत्रित लढा देऊन आधी या संकटातून बाहेर येवू, मग राजकारण करता येईल असा सूर या आढावा बैठकीत अनेकांकडून आळविण्यात आला.
खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची होणारी लूटमार आणि उपचार सुविधा याबाबत आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ कारवाई करण्याचे संकेत दिले दोषी रुग्णालय आणि संबंधित डॉक्टर यांची नोंदणी रद्द करण्यात येतील असा सज्जड इशारा दिला आहे. या बैठकीनंतर झालेल्या चर्चेतील सुचनांना सकारात्मक प्रतिसाद मनपा आयुक्तांनी दिला असल्याची माहिती नवी मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.