भास्कर गायकवाड
नवी मुंबई : महाराष्ट्रातल्या सधन समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराचा समावेश आता कोरोनाग्रस्तांचे शहर म्हणून होवू लागला आहे. अडीच हजार कोटींच्या ठेवी, मोरबेसारखे स्वमालकीचे धरण, केंद्र व राज्य सरकारकडून सतत होणारा पुरस्कारांचा वर्षाव ही ओळख कोरोना काळात धुरकट होत चालली असून कोरोनाचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्यात होवू लागली आहे.
रविवार, दि. ७ जून रोजी नवी मुंबई शहरात कोरोनाचे ११५ रूग्ण आढळले असून ४१ रूग्ण कोरोनामुक्तही रविवारी झाले आहेत. दिघा ते बेलापुरदरम्यान सिमित असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये यापूर्वीही तीन वेळा शंभरावर कोरोना रूग्ण आढळले असून नवी मुंबईतील अनेक रूग्णालयांमध्ये मुंबई, ठाणे, पनवेलमधील कोरोना रूग्ण उपचारासाठी येवू लागले आहेत. एपीएमसीमुळे कोरोना रूग्ण वाढत असल्याचा कांगावा करत काही राजकीय घटकांनी महाविकास आघाडीला विशेषत: पालकमंत्री एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला खरा, पण आता मार्केटशी काही संबंध नसणाऱ्या लोकांनाच कोरोनाची लागण होवू लागल्याने या कांगावा खोटा ठरला आहे.
दररोज कोरोना रूग्णांचा आकडा वाढत असून यामुळे नवी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अन्य आजाराच्या रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात जागाच नसल्याने माजी नगरसेवकांना दररोज खासगी रूग्णालय व्यवस्थापणाशी संघर्ष करावा लागत आहे. प्रभागाप्रभागातील राजकीय कार्यकर्त्याकडून, माजी नगरसेवकांकडून कोविड चाचणी कॅम्प राबविण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जावू लागली आहे. कोपरखैराणे, तुर्भे पाठोपाठ नेरूळमध्येही कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे.