नवी मुंबई : कोपरखैराणे प्रभाग ४२ मधील नागरी समस्यांचे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर युध्दपातळीवर करण्याची मागणी माजी नगरसेवक देविदास हांडेपाटील यांच्या पत्नी समाजसेविका सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
माझे यजमान देविदास अनंतराव हांडेपाटील हे कोपरखैराणे परिसरातील प्रभाग ४२ मधील भाजपचे नगरसेवक होते. सोमवारी १८ मे २०२० रोजी सकाळी त्यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. तथापि स्थानिक विभागातील रहीवाशी आजही समस्या घेवून येत असल्याने मला आपणास समस्या निवारणासाठी संपर्क करावा लागत असल्याचे समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच स्पष्ट केले आहे.
प्रभाग क्रं ४२ मध्ये सेक्टर १६, १७, २२, २३ या परिसराचा समावेश होत आहे. बुधवार, दि. ३ जून रोजी झालेल्या सोसाट्यांच्या वाऱ्यामुळे प्रभागात झाडांच्या फांद्या तसेच पालापाचोळा काही ठिकाणी पडला आहे. या घटनेला ९६ तास उलटले तरी पालिका प्रशासनाकडून फांद्या व पालापाचोळा उचलला न गेल्यान परिसराला बकालपणा आहे. आधीच कोपरखैरणे परिसरात कोरोनाचे तांडव सुरू असतानाच आता पावसामुळे ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीचे आजारही बळावण्याची दाट शक्यता आहे. यामुळे प्रभागातील लोकांच्या जिविताच्या सुरक्षेवर टांगती तलवार निर्माण झालेली आहे. हांडेपाटीलसाहेब यांचे निधन झाल्याने हा प्रभाग पोरका झाला आहे. या प्रभागाची काळजी घेण्यासाठी आता कोणी वालीच उरला नसल्याची भावनिक नाराजी आता रहीवाशांकडून उघडपणे व्यक्त केली जावू लागली आहे. आपण संबंधितांना तात्काळ पडलेल्या झाडांच्या फांद्या व पालापाचोळा उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी समाजसेविका सुनिता हांडेपाटील यांनी केली आहे.
सध्या प्रभागात आपण पाहणी अभियान राबवून प्रभागातील गटारांमधील माती, गाळ, तुंबलेला कचरा खरोखरीच काढण्यात आला आहे अथवा नाही याची पाहणी करावी अन्यथा संततधार पाऊस पडल्यास परिसर जलमय होवून स्थानिक रहीवाशांच्या अडचणीत भर पडण्याची व पुन्हा साथीचे आजार बळावण्याची भीती आहे. ज्या ठिकाणी विकासकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी पालिका प्रशासनाने पत्रे अथवा लाकडाचे कुंपन घालून स्थानिक रहीवाशांना त्रास होणार नाही याची प्राधान्याने काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी गटारे उघडी असतील, ती तात्काळ झाकण्यात यावी, जेणेकरून साचलेल्या पाण्यात कोणाला अंदाज न आल्यास खुल्या गटारामुळे कोणाच्याही जिवितास इजा होणार नाही. दुर्घटना टाळण्यासाठी आपण संबंधितांना प्रभागातील या समस्या निवारणाचे आदेश देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.
प्रभाग क्रं ४२ मधील सेक्टर १६, १७, २२, २३ या परिसरातील झाडांच्या धोकादायक ठरू पाहणाऱ्या तसेच ठिसूळ झालेल्या फांद्यांची तात्काळ छाटणी करण्यात यावी. या धोकादायक व ठिसूळ झालेल्या फांद्या जिवित व वित्त हानीस कारणीभूत ठरण्याची तसेच झाडांखाली पार्क असलेल्या वाहनांचे नुकसान करू शकतात. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितास धोकादायक व ठिसूळ झालेल्या फांद्यांची छाटणी पालिका प्रशासनाकडून युध्दपातळीवर होणे आवश्यक आहे. या प्रभागातील परिसराचा विकास हे आमचे यजमान व या प्रभागाचे नगरसेवक देविदास हांडेपाटील यांचे स्वप्न होते, ध्येय होते, येथील स्थानिक रहीवाशांना नागरी सुविधा पुरविणे व त्यांच्या नागरी समस्या सोडविणे ही त्यांची महत्वाकांक्षा होती.अखेऱच्या क्षणापर्यत ते स्थानिक रहीवाशांसाठीच झटले आहेत. त्यांच्या पश्चात नागरी समस्यांचा उद्रेक होवू नये यासाठी आपण विशेष बाब म्हणून पावसाळी परिस्थितीचा आढावा घेताना या परिसरातील नागरी समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.