भास्कर गायकवाड : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे फाटक बंद असल्याने स्थानिक रहीवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. एनएमएएमटी व बेस्टच्या बसेसची सुविधा मिळत नाही. सानपाडा अथवा वाशीला जाण्यासाठी शिरवणे व वाशीला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे स्थानिक रहीवाशांना होत असलेला त्रास आणि सहन करावा लागणारा मनस्ताप दूर करण्यासाठी जुईनगर रेल्वेचे फाटक लवकरात लवकर उघडण्याची मागणी जुईनगरमधील समाजसेवक आणि महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य विजय साळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ येथील महापालिका विभाग अधिकारी सोमनाथ आडव यांची भेट घेवून रेल्वे फाटकामुळे जुईनगरवासियांना होत असलेला त्रास विजय साळे यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिला व एक निवेदनही साळे यांनी त्यांना सादर केले. सध्या राज्य सरकारने लॉकडाऊनही शिथील केले आहे. त्यातच स्थानिक रहीवाशांना सानपाडा येथील डी-मार्ट, एपीएमसी येथील मार्केट तसेच वाशीला जाण्यासाठीही शिरवणे, नेरूळ येथून जावे लागत आहे. बेस्ट तसेच एनएमएमटीची सुविधा नसल्याने रहीवाशांना रिक्षांवर खर्च करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर रेल्वे फाटक खुले करण्याची मागणी विजय साळे यांनी केली आहे.