भास्कर गायकवाड : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दादर येथील टिळक भवन हे कार्यालय सोमवार, दि. ८ जूनपासून पुन्हा सुरु करण्यात आले असून शासनाच्या नियमानुसार १० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात असेल. या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याच्या तसेच अभ्यंगतांना अपॉईंटमेंट घेऊनच प्रवेश देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
थोरात आज दादर येथील टिळक भवन या पक्षाच्या कार्यालयात आले होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, सरचिटणीस राजन भोसले, सरचिटणीस व प्रवक्ते राजेश शर्मा, सरचिटणीस यशवंत हाप्पे, सचिव राजाराम देशमुख, कार्यालय अधिक्षक नामदेव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थितही होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, दोन महिन्यांचा काळ मोठ्या संकटाचा होता, या काळात सर्वांनी धैर्याने काम केले. लॉकडाऊन असल्यामुळे या काळात पक्ष कार्यालय बंद ठेवण्यात आले होते परंतु पक्षाचे काम मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरुच होते. या गंभीर संकटाच्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन गरजू लोक, कामगार, गरिब, लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केली. अन्नधान्य, रेशन, औषधे, सॅनिटाईझर, मास्क याची मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी मेहनत घेतली आहे.
निसर्ग चक्रीवादळावर बोलताना थोरात म्हणाले की, चक्रीवादळाचा इशारा मिळताच राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केल्या होत्या, एनडीआरएफची पथके कोकण, पालघर भागात तैनात करण्यात आली होती. किनारपट्टीवरील लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. परंतु निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणांना तातडीने आदेश देऊन वीज पुरवठा सुरळित करणे, रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. तसेच घरांची पडझड, शेतमालाचे नुकसान यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही देण्यात आले असून आज हे काम पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. बहुतांश भागातील पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून श्रीवर्धन, मुरुड या जास्त नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्यांचे कामही लवकरच पूर्ण होईल, असे थोरात म्हणाले.