भास्कर गायकवाड : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रीय नागरिक आरोग्य मिशनअंर्तगत पालिका प्रशासनातील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या परिचारीकांची वेतन वाढ करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागांत राष्ट्रीय नागरिक आरोग्य मिशनअंर्तगत परिचारिका काम करत आहेत. राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही आरोग्य विभागात राष्ट्रीय नागरिक आरोग्य मिशनअंर्तगत परिचारिका काम करत आहेत. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या परिचारिकांना २० ते २४ हजार रूपये मासिक वेतन मिळते. या परिचारिका (बीएससी नर्सिग) उच्च शिक्षित आहेत. आपल्या महापालिकेत मात्र अवघ्या ८ ते १० हजार रूपये तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. सध्या कोरोना महामारीच्या काळात या परिचारिका आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालून कोरोना रूग्णांची सेवा करत आहेत. वेतन काय तर ८ ते १० हजार रूपये आणि तरीही त्या परिचारिका इमानेइतबारे कोरोना रूग्णांची सेवा करत आहेत. महागाईच्या काळात या अत्यल्प वेतनात परिचारिकांना कुटूंब चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आर्थिक अडचणींमुळे या परिचारिकांचे मानसिक स्वास्थ्य नजीकच्या काळात बिघडण्याची भीती आहे. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे आपल्याही महापालिकेने या परिचारिकांचे वेतन करावे यासाठी मी सतत आपणाकडे पाठपुरावा करत आहे. आपणास यापूर्वी ९ मे २०२० रोजी लेखी निवेदन देवून या गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका आरोग्य विभागाकडून याबाबत काहीही हालचाली सुरू न झाल्याने पुन्हा एकवार निवेदन देवून या समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देत आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागांत राष्ट्रीय नागरिक आरोग्य मिशनअंर्तगत काम करणाऱ्या परिचारिका तसेच ठोक मानधनावरील परिचारिका यांच्या वेतनात लवकरात लवकर वाढ होणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य, परिचारिकांची होणारी आर्थिक ससेहोलपट, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील वेतन व त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत आपली असणारी भक्कम आर्थिक बाजू पाहता लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद देवून या मागणीवर तोडगा काढण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.