नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ८४ मधील वृक्षछाटणी, नालेसफाई, धुरीकरण आदीं तात्काळ करण्याची मागणी भारतीय जनता युवती मोर्चाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी नायडू यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
प्रभागात झाडांच्या फांद्या धोकादायक झाल्या आहेत. ठिसूळ झाल्या आहेत. त्या वाऱ्यामध्ये पडून जिवित व वित्तहानी तसेच झाडांच्या खाली उभ्या असणाऱ्या वाहनांचीही हानी होण्याची शक्यता आहे. प्रभागात गटारे व नालेही आहेत. या गटारे व नाल्यांची तळापासून सफाई न केल्यास संततधार पावसात ते ओव्हरफ्लो होवून साथीचे आजार वाढण्याची भीती सौ. सुहासिनी नायडू यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
प्रभागात आपण स्वखर्चाने धुरीकरण तसेच जंतुनाशक फवारणी करत असलो तरी त्यास मर्यादा पडत आहे. प्रशासनाने प्रभागातील एलआयजी, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वरचेवर नियमिपणे ही कामे करावी असे सौ. सुहासिनी नायडू यांनी म्हटले आहे.