
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : शहरातील वाढत्या कोरोनाचे संक्रमण आणि यासाठी मनपा मार्फत पुरवल्या जाणाऱ्या सुविधा यासाठी विचारविनिमय करण्यासाठी नेरुळ ब्लॉक काँग्रेस मार्फत बैठकीचे आयोजन रवींद्र सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या बैठकीमध्ये कोरोनाचा संसर्ग बळावल्यापासून महापालिका आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
रूग्णांना व त्यांच्या नातलगांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. रुग्णांना भर्ती करताना पुरेशा प्रमाणात बेडसचा अभाव, शासनाने निर्देश देवूनही अव्वाच्या सव्वा बिल वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांची मनमानी, कोविड वगळून इतर आजारांना रुग्णालयात कोणती आणि कशी व्यवस्था आहे. खासगी रुग्णालय असणारी व्यवस्था आणि अडचणी यावर या बैठकीत उहापोह करण्यात आला. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ८० टक्के जागा शासकीय दराने खासगी रुग्णालयाने उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने कडक धोरण राबवावे,
कोरोनाबधित रुग्णांचा सांख्यिकी अहवाल सादर होतो, त्याच धर्तीवर रुग्णालयातील बेडस संख्या आणि दरपत्रक दर्शनी भागात लावणे आदी पूरक मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
तसेच नवी मुंबई कोविडचा अहवाल जसा रोज महापालिका जाहिर करते. तसाच रोज किती बेड शिल्लक आहेत, हॉस्पिटलमध्ये याची पण यादी जाहीर करा अशी मागणी कॉंग्रेस पालिका प्रशासनाकडे करणार आहे , याचबरोबर कोविड वगळता शिल्लक बेडसची पण माहिती दरदिवशी द्यावी. जेणेकरून खासगी रुग्णालय व्यवस्थापनाच्या लुटीला आळा घालता येईल. पारदर्शक कारभारासाठी नवी मुंबई काँग्रेस पक्षाने आक्रमक होण्याचा निर्णय या बैठकीत घेतला आहे. वेळप्रसंगी विधायक पद्धतीने दाद मागितली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व रुग्णालय आणि त्यांचा कारभार याकडे काँग्रेसची नजर असेल. या अनुषंगाने नेरूळ परिसरातील सर्व खासगी रुग्णालयात काँग्रेस कमिटी प्रत्यक्ष भेट देणार आहे. या विविध मुद्द्यांवर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली जाणार आहे.या महत्वाच्या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सचिव संतोष शेट्टी, जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, संतोष सुतार, विजय कुरकुटे, तुकाराम कदम, शेवंता मोरे, विद्या भांडेकर, कल्पेश थोरावडे, तालुका पदाधिकारी विनायक तळेकर, दिनेश गवळी, गोविंद साटम, सुरेश सदावर, प्रल्हाद गायकवाड , घाटे , राजेश भांबुरे, राधिका कांबळे, वासंती पुजारी आदी हजर होते.