
एमजीएम रुग्णालयाचा गलथान कारभार येणार उघड्यावर ?
व्यवस्थापक शिकाऊ डॉक्टारांच्याही जीवाशी करत आहेत खेळ
शिकाऊ डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांवर चुकीचे उपचार ?
एमआयएमचे हाजी शाहनवाज खान यांनी मागितले लेखी उत्तर
पनवेल : महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट अंतर्गत शिकाऊ डॉक्टर मार्फत रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करीत असलेल्या घटना घडत असल्याने कोरोना महामारीमध्ये कोरोना रुग्ण आहे की नाही याबाबतचा अहवाल येण्याअगोदरच शिकाऊ डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत असल्यामुळे बरेच रुग्ण जीवानिशी दगावत असून या प्रकरणाचे सत्य जगासमोर उघड करावे अन्यथा न्यायालयामार्फत हे सत्य समोर आणावे लागेल असा इशारा एआयएमआयएम च्या विद्यार्थी संघटनेचे कोकण निरीक्षक हाजी शाहनवाज खान यांनी एमजीएम रुग्णालय व्यवस्थापनाला लेखी निवेदनातून दिला आहे.
तसेच या निवेदनाच्या प्रति पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत.
एका बाजूला नवख्या डॉक्टरांचा वापर करून कोरोना रुग्णांवर उपचार करून एमजीएम रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या जिवाशी खेळत आहे. एमजीएम रुग्णालयातील अनुभवी डॉक्टर हे या कोरोना महामारीमध्ये योग्य उपचार करू शकतात, मात्र अति संवेदनशील रुग्णांवर देखील शिकाऊ डॉक्टर कडून उपचार केले जात असल्यामुळे शिकाऊ डॉक्टर यांच्यासह कोरोना रुग्णांच्या जीवाची बाजी लागली आहे. याची साधी दखल ही एमजीएम प्रशासन घेत नाही आहे. त्यामुळे याबाबतचे योग्य ते सत्य एमजीएम प्रशासनाने लेखी स्वरूपात द्यावे अन्यथा पुढील पाऊले उचलावी लागतील तसेच एमजीएम रुग्णालय व्यवस्थापनाची नार्को टेस्टची मागणी करून सत्य बाहेर आणावे लागेल. असा इशाराही यावेळी पत्राद्वारे हाजी शाहनवाज खान यांनी दिला आहे. निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे चुकीचे उपचार, चुकीचे कोरोना रिपोर्ट, उपचारांबाबत होणारी हातघाई, शिकाऊ डॉक्टर यांच्यामार्फत होणारी उपचार पद्धती, तसेच शिकाऊ डॉक्टर यांच्या जीवाला असणारा कोरोनाचा धोका याबाबत एमजीएम व्यवस्थापकीय मंडळ कोणत्या उपाययोजना करीत आहेत, त्याची माहिती देण्यात यावी, असेही यावेळी निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.