
समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांची महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळांकडे मागणी
नवी मुंबई : कोपरखैराणे, प्रभाग 42 मधील सेक्टर 16, 17, 22, 23 परिसरात पाहणी अभियान राबवूून वृक्षछाटणी करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून बुधवारी (दि. 17 जुन) केली आहे.
कोपरखैराणे नोडमधील प्रभाग क्रं 42 मध्ये सेक्टर 16, 17, 22, 23 या परिसराचा समावेश होत आहे. बुधवार, दि. 3 जून रोजी झालेल्या सोसाट्यांच्या वार्यामुळे प्रभागात झाडांच्या फांद्या तसेच पालापाचोळा काही ठिकाणी पडला होता. या घटनेला अनेक दिवस उलटून गेल्यावरही अनेक दिवस हा कचरा पालिका प्रशासनाकडून उचलला गेला नव्हता. यामुळे परिसराला बकालपणा येवून रोगराई वाढण्याचीही भीती निर्माण झाली होती. यावेळी कोपरखैराणेतील पालिका विभाग कार्यालयात अनेकांनी संपर्क साधला असता, उडवाउडवी, वेळप्रसंगी उर्मटपणाची उत्तरे देण्यात आली असल्याचे रहीवाशांचे म्हणणे आहे. मनुष्यबळ कमी असल्याचे सांगण्यात आले. वृक्षांच्या धोकादायक फांद्या, ठिसूळ फांद्या वार्यापावसात कधीही पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिवित व वित्त हानी होण्याची भीती आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर फांद्या पडल्यास वाहनांचे नुकसानही होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात मनुष्यबळ कमी असल्याने आपण ठराविक काळापुरते मनुष्यबळ घेतो. त्याचधर्तीवर आपण पावसाळा कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून पावसाळीपूर्व कामांसाठी तात्पुरत्या कालावधीसाठी मनुष्यबळ घेण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रभागातील सेक्टर 16, 17, 22, 23 या परिसरात पालिका प्रशासनाने लवकरात लवकर पाहणी अभियान राबविणे आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी धोकादायक फांद्या असतील, ठिसूळ झालेल्या फांद्या असतील त्यांची युध्दपातळीवर छाटणी करून जिवित व वित्त मालमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे. वाहनांची सुरक्षाही जपली जाईल. गृहनिर्माण सोसायटीच्या आवाराबाहेर आलेल्या फांद्याही ठिसूळ असतील तर त्यांचीही छाटणी करावी. कारण गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशीदेखील मालमत्ता प्रशासनाचे करदाते नागरिक आहेत. सोसायटीची झाडे आहेत असे सांगून पालिका प्रशासनाने जबाबदारी झटकू नये. लवकरात लवकर आपण संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना प्रभाग 42 मधील कोपरखैराणे सेक्टर 16, 17, 22, 23 या परिसरात पाहणी अभियान राबविण्याचे व धोकादायक तसेच ठिसूळ झालेल्या फांद्याची छाटणी करण्याचे निर्देश देवून स्थानिक जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.