
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य आणि देश कोरोनारुपी संकटातून जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने साजरा करावा आणि हे संपूर्ण वर्ष लोकसेवेसाठी अर्पण करावे असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्याअनुषंगाने आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यासाठी सोमवारी १५ जून रोजी नेरुळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस गौतम आगा, माजी नगरसेवक संदीप सुतार आदी उपस्थित होते. कोरोना विषाणूंच्या विरोधात लढताना राज्यात आत्तापर्यंत सुमारे साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. डॉक्टर, पोलीस, नर्सेस, सफाई कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी कोरोना विरुद्धची लढाई सक्षमपणे लढत असून काही जणांनी या लढाईत प्राण देखील गमावले आहेत. या खऱ्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई जिल्ह्यात राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने गरजुंना अन्नधान्याच्या, शिजवलेल्या अन्नाच्या पाकिटांचे वाटप, पालेभाज्या, फळे, मास्क, सॅनिटारझर, ग्लोज, पीपीई किट आदी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येत असून वैद्यकीय शिबिरांचे देखील आयोजन केले जात असल्याचे गावडे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे यासाठी खा. शरद पवार यांनी राज्यभर जिल्हा आणि तालुका पातळीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात सांगितले होते. त्याला अनुसरून शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहरातील नागरिक आणि तरुणांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे गावडे यांनी सांगितले. नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून वाशी सिडको प्रदर्शनी केंद्र येथे १२०० खाटांचे कोव्हीड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. या कोव्हीड रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आदींनी केली असून रुग्णांच्या सेवेसाठी तत्काळ कोव्हीड रुग्णालय सुरु करण्यात आले असल्याचे गावडे यांनी सांगितले. नवी मुंबई शहरातील खाजगी रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून रुग्नांची लूट केली जात असल्याचे प्रकार समोर आले असून याबाबत वरिष्ठाना कळविले आले असल्याचे सांगत अशा रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे गावडे म्हणाले. देशाच्या इतिहासात राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे ज्याने स्थापनेच्या केवळ आठ महिन्यात राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळविला. राष्ट्रवादी पक्ष लोकशाहीच्या परंपरेत रुजलेला असल्याने दिल्या दोन दशकात पक्षाने चार वेळा सत्ता स्थापन केली आहे. शरद पवार यांनी बूथ समित्या तयार करण्याचे काम जिल्हा पातळीवर हाती घेतले होते आणि या मोहिमेत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रियपणे कार्यरत आहेत. अनेक लोकपयोगी कार्यक्रम राबविले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी, त्यांची मते, सूचना जाणून घेण्यासाठ, तळागाळातील प्रश्न समजून घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ हा अनोखा उपक्रम राबविला. या कोरोना लढ्याचा सामना करताना तसेच येणाऱ्या काळात विविध समस्यांना तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिलेले अभिप्राय मोलाचे ठरणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. कोरोना काळात नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कुटुंबातील वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांची काळजी घ्यावी. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन गावडे यांनी केले आहे.