
नवी मुंबई : संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ परिसरातील पदपथांची ब्लिचंग पावडरने सफाई करण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी लेखी निवेदनातून महापालिका नेरूळ विभाग अधिकारी सोमनाथ आडव यांच्याकडे केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. संततधार पाऊस पडल्यावर पदपथावर शेवाळ साचून निसरडे होतात. पदपथावरून चालताना महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडतात. त्यांना जखमा होतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ परिसरातील सर्वच पदपथांची ब्लिचंग पावडर टाकून महिन्यातून दोन वेळा सफाई करण्यात यावी. ज्यायोगे संततधार पाऊस पडला तरी पदपथ निसरडे होणार नाहीत. कोणी चालताना घसरून पडणार नाही व जखमीही होणार नाही. संततधार पाऊस नुकताच चालू झाला आहे. समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास आणून देत असल्याने आपण गांभीर्य ओळखून कार्यवाही करावी, अशी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.