
लोकनेते आ. गणेश नाईक यांची सुचना
नवी मुंबई : टप्प्याटप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आराखडा तयार करावा आणि पालकांमधील संभ्रमाचे वातावरण दूर करावे, अशी सुचना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
शाळा सुरु झाल्यावर कोरोना संक्रमणाचा धोका वाढणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गात अंतर ठेवून बसण्याची सोय, स्कूल बसमध्ये प्रवास करताना सोशल डिस्टंसिंग कसे पाळणार, दररोज विद्यार्थ्यांसह शाळेत प्रवेश करणार्यांचे थर्मल स्क्रिनिंग करणार काय, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण किती वेळा करणार या सर्व उपाययोजनांचे वेळापत्रक ठरवून मुल्यमापन करणे गरजेचे असल्याचे लोकनेते नाईक यांनी म्हंटले आहे.
दुसरीकडे शासनाने सध्या सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक त्रुटी असून ८० टक्के विद्यार्थी आणि पालक नाखुष असल्याचे लोकनेेते नाईक यांनी म्हंटले आहे. राज्यातील ग्रामिण भागातील आणि शहरातील गरीब विद्यार्थ्यांकडे स्वतंत्र मोबाईल संच, इंटरनेट सेवा, नेटवर्क इत्यादीचा आभाव आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे कठिण बनले आहे. तासनतास मोबाईलकडे बघून विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. विशेषतः अपंग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण जीवाला घोर असणार आहे.
तीसरी महत्वाची बाब म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१मध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांमधील सुविधांचा वापर होणार नाही. शाळांच्या खर्चाची बचत होणार असेल तर पालक-शिक्षक कमिटीच्या बैठकीत चर्चा करुन विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी शाळा या दृष्टीने चालढकल करीत आहेत, असे लोकनेते नाईक यांनी निदर्शनास आणले आहे. शाळांनी फिवाढ न करता विद्यार्थ्यांना प्रचलित फि मध्ये सवलत द्यावी आणि शासनाच्या या संदर्भातील निर्देशांचे महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची खबरदारी शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी लोकनेते नाईक यांनी केली आहे.