
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात आता कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा आता चार हजाराच्या घरात गेला आहे. सोबत आता काही दिवसातच साथीच्या आजाराचाही उद्रेक होण्याची भीती आहे. शहरातील पालिकेच्या व खासगी रूग्णालयातही कोरोना रुग्णांचाच समावेश मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. महापालिका प्रशासनाकडून दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची तसेच बरे झालेल्या रूग्णांची आकडेवारी दररोजच जनसंपर्क विभागाकडून प्रकाशित करण्यात येत असते. त्या जोडीने नवी मुंबईतील महापालिकेच्या व खासगी रूग्णालयात किती रूग्ण आहेत व कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जागा शिल्लक आहेत याचाही उल्लेख दररोज प्रसिध्दीपत्रकात करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस प्रवक्ते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
कॉंग्र्रेसचे प्रदेव सचिव संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना भेटले. यावेळी संतोष शेट्टी व नवी मुंबई महिला कॉंग्रेस सचिव विद्या भांडेकर आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस प्रवक्ते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी चर्चा करताना कोरोना, खासगी रूग्णालय, जागांची कमतरता आदी सर्वच समस्यांवर विस्तृत चर्चा केली.
कोरोना वगळता अन्य आजारावरील रूग्णांना आता कोणत्याही रूग्णालयात घेतले जात नसल्याचे प्रकार ठिकठिकाणी निदर्शनास येत आहेत. त्यामुळे रूग्णांना व त्यांच्या नातलगांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. रुग्णांना भर्ती करताना पुरेशा प्रमाणात बेडसचा अभाव, शासनाने निर्देश देवूनही अव्वाच्या सव्वा बिल वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांची मनमानी, कोविड वगळून इतर आजारांना रुग्णालयात कोणती आणि कशी व्यवस्था आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ८० टक्के जागा शासकीय दराने खासगी रुग्णालयाने उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने कडक धोरण राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संतोष शेट्टी यावेळी आयुक्तांसमोर मांडले.
कोरोनाबधित रुग्णांचा सांख्यिकी अहवाल सादर होतो, त्याच धर्तीवर रुग्णालयातील बेडस संख्या आणि दरपत्रक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. तसेच नवी मुंबई कोविडचा अहवाल जसा रोज महापालिका जाहिर करते. त्याचप्रमाणे दररोज किती बेड शिल्लक आहेत, हॉस्पिटलमध्ये याची पण यादी जाहीर करा, याचबरोबर कोविड वगळता शिल्लक बेडसची पण माहिती दरदिवशी द्यावी. जेणेकरून खासगी रुग्णालय व्यवस्थापनाच्या लुटीला आळा घालता येईल असे मत या बैठकीत नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी व्यक्त केले.
नवी मुंबईमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून नवी मुंबईकर एका वेगळ्या भीतीखाली वावरत आहेत. प्रगत शहरात उपचारासाठी धावपळ करावी लागणे हे चित्र या विकसित शहराला भूषणावह नाही. समस्या गंभीर आहे. रूग्णालयात उपचार न मिळाल्यास परिस्थिती स्फोटक होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समस्येचे गांभीर्य व वस्तूस्थिती ध्यानात कोरोनाची आकडेवारी जाहीर करताना दररोजच्या प्रसिध्दीपत्रकात महापालिकेच्या तसेच खासगी रूग्णालयात किती जागा शिल्लक आहेत व त्यातील किती जागा कोरोना रूग्णासाठी आणि किती जागा बिगर कोरोना रूग्णांसाठी आहेत याचीही तपशीलवार माहिती दररोज नवी मुंबईकरांच्या हितासाठी असल्याने कोरोना पार्श्वभूमीवर रूग्णालयीन माहितीचा दैनंदिन आढावा प्रकाशित करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनातून केली आहे.