
नवी मुंबई : कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि जनसामान्यात पसरलेली भिती या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मध्ये ‘कोव्हिड-१९, मास स्क्रिनिंग’ शिबिराचे तातडीने आयोजन करण्याची मागणी जनसेवक गणेशदादा भगत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ ए व सेक्टर १८ परिसराचा समावेश होत आहे. कोरोना पर्व नवी मुंबईत सुरू झाल्यापासून प्रभाग ९६ मध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. पालिका प्रशासनाकडे उपलब्ध असलेली आकडेवारी पाहिल्यावर कोरोना रूग्णांची संख्या प्रशासनाच्या निदर्शनास येईल. कोरोनाबाबत स्थानिक जनतेमध्ये भयाचे वातावरण आहे. जनसामान्यामध्ये असलेले भितीचे वातावरण पाहता त्यांना दिलासा देणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर ‘कोव्हिड-१९, मास स्क्रिनिंग’ शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी गणेशदादा भगत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.