
नवी मुंबई : प्रभाग ७६ मधील सानपाडा कॉलनी विभागात कोव्हिड १९ स्क्रिनींग कॅम्प आयोजित करावा म्हणून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना तीन वेळा निवेदन दिले. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना दोन वेळा निवेदन सादर केले. महापालिका अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभागाचे उपायुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी यांनाही एकवेळा निवेदन सादर केले. आजूबाजूच्या प्रभागात कोव्हिड १९ स्क्रिनींग कॅम्प होतात, आम्ही मागणी करूनही आयोजित करत नाही, प्रभाग ७६ मधील रहीवाशी महापालिका प्रशासनाला कर भरत नाही काय? असा संतप्त सवाल भाजपचे कार्यकर्ते व समाजसेवक पाडूंरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना लेखी निवेदनातून विचारला आहे.
कोव्हिड १९ स्क्रिनींग कॅम्प प्रभाग ७६ मध्ये आयोजित करण्यासाठी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिलेल्या लेखी निवेदनात समाजसेवक पांडूरंग आमले पुढे म्हणाले की, सानपाडा परिसर तसेच सानपाडा पामबीच परिसरात कोरोना रूग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्याचे सर्वानाच माहिती आहेच. कोरोना आजाराएवजी त्याच्या भीतीनेच सानपाडा कॉलनी विभागात प्रभाग ७६ मधील भयभीत झाले आहेत. कोपरखैरणे व अन्य परिसरात महापालिका प्रशासनाकडून कोव्हिड १९ स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात आले, सानपाडा नोडमध्ये प्रभाग त्याचप्रमाणे समस्येचे गांभीर्य ध्यानात घेता सानपाडा कॉलनी विभागात तसेच पामबीच भागात लवकरात लवकर राबविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
३ जून रोजी तसेच ८ जून रोजीही आपणास या समस्येविषयी निवेदन दिलेले आहे. सानपाडा नोडमध्ये अन्य प्रभागात ‘कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प’ राबविण्यात येत आहे. मात्र आम्ही मागणी वारंवार करून तसेच पाठपुरावा करूनही आमच्या प्रभाग ७६ मध्ये हा कॅम्प राबविणेविषयी कानाडोळा का केला जात आहे. या प्रभागातील रहीवाशी कराचा भरणा पालिका प्रशासनाकडे करत नाहीत काय? मग इतरत्र कॅम्प राबविले जात असताना आमच्याच प्रभागाच्या बाबतीत का दुजाभाव केला जात आहे? कोरोनाचा उद्रेक झाल्यावरच पालिका प्रशासन या ठिकाणी हा कॅम्प राबविणार आहे का? कृपय्या समस्या गंभीर असल्यानेच आम्ही आपणाकडे पाठपुरावा करत आहोत. समस्येचे गांभीर्य जाणून सहकार्य करावे अशी मागणी समाजसेवक पांडूरंग आमले यांनी केली आहे.