नवी मुंबई : केंद्र सरकारकडून मागील आठ दिवसापासून सतत डिझेल व पेट्रोल दरवाढीचा नेरूळ तालुका कॉंग्रेसकडून निदर्शने करून निषेध करण्यात आला.
पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसापासून दरवाढ होत आहे. कोरोना काळात सर्वसामान्य लोक जगण्यासाठी संघर्ष करत असताना केंद्रातील मोदी सरकारने लोकांच्या परिस्थितीचा विचार न करता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा कार्यक्रम सुरू केला असल्याचे सांगत नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेध आंदालनाचे आयोजन केले होते. या निषेध कार्यक्रमात कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून सुरूवातीला केंद्र सरकारच्या विरोधात खूप वेळ घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली.
पूर्वी लोक पेट्रोल महाग असल्याने डिझेलची गाडी घेत होते. पंरतु सध्याच्या काळात सातत्याने होत असलेली इंधनाची दरवाढ पाहता इंधनावरील गाड्या बैलगाडीत टाकून नेण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत असताना डॉलर महागल्यावर इंधन दरवाढ केली असताना भाजपाने आंदोलने व टीका केली होती. आज तेच भाजप नेते, पदाधिकारी कोठे बसले आहेत? कोरोना काळात लोक हतबल झाले असताना केंद्राकडून सतत होत असलेली इंधनवाढ पर्यायाने महागाईला घातले जाणारे खतपाणी सर्वसामान्यांच्या जिविताशी खेळण्याचा प्रकार असून कॉंग्रेस पक्ष याचा निषेध करत असल्याचे नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.
या निदर्शनात नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्यासह जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी संतोष सुतार, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, कल्पेश थोरावडे , विजय कुरकुटे, संतोष पाटील , शेवंता मोरे ,प्रल्हाद गायकवाड ,सुधीर पांचाळ ,प्रकाश देसाई, उत्तम पिसाळ ,तानाजी जाधव, तोडकर, कोडग, तुषार पाटील, रामचंद्र माने, राहुल कापडाने, संग्राम इंगळे, वासंती पुजारी, नीलम अडविलकर आदी सहभागी झाले होते.