नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील शिवम सोसायटी, समाजमंदिर, हिमालय सोसायटी व अन्य ठिकाणी पदपथावर असलेल्या झाडांच्या फांद्या व पालापाचोळा त्वरित उचलून बकालपणा परिसराला आलेला बकालपणा हटविण्याची लेखी मागणी नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या संपादक सौ. सुवर्णा खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ८५ मधील नेरूळ सेक्टर सहा परिसरात दि. ३ जून २०२० रोजी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची, ठिसूळ झालेल्या धोकादायक फांद्यांची पडझड झालेली आहे. पडलेल्या फांद्या रस्त्यावर वाहतूकीस अडथळा नको म्हणून पदपथावर गोळा करून त्याचे ढिगारे करून ठेवले. आज या घटनेला २५ दिवसाचा कालावधी लोटला तरी वादळात पडझड झालेल्या त्या फांद्यांचा कचरा व पालापाचोळा उचलून नेण्यास पालिका प्रशासनाला वेळ मिळाला नाही, हे येथील करदात्या नागरिकांचे दुर्देवंच म्हणावे लागेल. पदपथावर या फांद्या व पालापाचोळा कचरा असल्याने स्थानिक रहीवाशांना पदपथाऐवजी रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. पदपथावर असलेल्या या कचऱ्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. पाऊस पडल्यावर या पदपथावरील कचऱ्यातून वाहणारे काळे पाणी स्थानिक रहीवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. कोरोनाचे रूग्ण परिसरात आढळून येत आहे. उद्या या कचऱ्यांमुळे डासांना खतपाणी मिळून स्थानिक रहीवाशांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची भीती आहे. आपणास या ठिकाणची छायाचित्रे सादर करत आहोत. समस्येचे गांभीर्य ओळखून आपण नेरूळ विभाग कार्यालयाला तात्काळ या फांद्या व पालापाचोळा पदपथावरून हटविण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी निवेदनातून नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या संपादक सौ. सुवर्णा खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.