नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतदेहांवरील अंत्यसंस्कारझाल्यावरही पालिका प्रशासनाकडून जंतुनाशक फवारणी होत नसल्याची तक्रार नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या संपादक सौ. सुवर्णा खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात नेरूळ नोडमध्ये सेक्टर दोन परिसरात महानगरपालिकेची ‘सारसोळे शांतीधाम’ ही स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत नेरूळ नोडमधील इतर मृतदेहांसोबत कोरोनाग्रस्त मृतदेहांवरही अंत्यसंस्कार केले जातात. तथापि कोरोनाग्रस्त मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यविधी झाल्यावर महापालिका प्रशासनाकडून जंतुनाशक फवारणी केली जात नाही. त्यामुळे इतर मृतदेहांसोबत येणाऱ्या रहीवाशांच्या व स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांच्या जिवितावर टांगती तलवार पालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे निर्माण झालेली आहे. कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यविधी झाल्यावर त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना तसे निर्देशही दिलेले आहेत. मग आपणाकडे तशी अंमलबजावणी का होत नाही? स्मशानभूमीमध्ये कोरोनाग्रस्ताच्या अंत्यविधीनंतर जंतुनाशक फवारणी करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? १५ दिवसापूर्वी आमच्या विभागातील एका वयस्कर आजीचे कोरोना आजाराने निधन झाल्यानंतरही त्या ठिकाणी ६ ते ७ कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. काल रात्री उशिरा सारसोळे गावातील एका कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. स्मशानभूमीतील कर्मचारी कोरोनाने मेल्यावर पालिका प्रशासन स्मशानभूमीत जंतुनाशक फवारणी करणार आहे काय? समस्या गंभीर आहे. आपण सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत तात्काळ जंतुनाशक फवारणी करण्याचे व ज्या ज्यावेळी कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार होतील, त्यानंतर लगेचच स्मशानभूमीत जंतुनाशक फवारणी करण्याचे नवी मुंबई महापालिकेतील संबंधितांना लेखी आदेश देण्याची मागणी नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या संपादक सौ. सुवर्णा खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.