नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८५ मधील नेरूळ सेक्टर सहामधील धोकादायक वृक्षांची छाटणी युध्दपातळीवर करण्याची मागणी नेरूळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यालगत, पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायटी आवारात अनेक वृक्षांच्या फांद्या ठिसूळ व धोकादायक झालेल्या आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकदा ठिसूळ व धोकादायक फांद्यामुळे जिवित व वित्तहानी होण्याची भीती आहे. कालच सोमवारी (दि. २९ जून) दर्शन दरबार मार्गावर वरूणा सोसायटीलगत व्हॅगर कंपनीच्या (एमएच ०५/एएस २३५५) एका वाहनावर धोकादायक फांदी पडून वाहनाचे खूप नुकसान झाले आहे. अग्निशमनच्या वाहनाने तात्काळ येवून मदत केली असल्याचे महादेव पवार यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
ठिकठिकाणच्या वृक्षांच्या फांद्याही धोकादायक व ठिसूळ झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी झाडांच्या फांद्या पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही वृक्षांच्या फांद्या धोकादायक व ठिसूळ झाल्या आहेत. या फांद्या पडल्या तर सोसायटी आवारातील वाहनांची तसेच बाजूच्या सोसायटीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. करदात्या नागरिकांची गैरसोय लक्षात घेता आपण त्याही फांद्यांची छाटणी करावी. वाटल्यास संबंधित सोसायटीकडून अत्यल्प क्षुल्क आकाराण्यात यावे. नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांची वृक्षांच्या पडझडीमुळे संभाव्य हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर वृक्षछाटणीचे आदेश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.