
नवी मुंबई : लांबवरच्या भागातील कोरोनाग्रस्त मृतदेहांना नेरूळ सेक्टर ४ मधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी महापालिका अधिकारी व रूग्णालयाचे व्यवस्थापक पाठवित असल्याने गुरूवारी (दि. १३ ऑगस्ट) रोजी सारसोळेच्या संतप्त युवकांनी स्मशानभूमीलाच टाळे ठोकण्याची घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. अखेर काही मान्यवरांच्या व पालिका अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने स्मशानभूमीचे टाळे काढण्यात आले. तथापि यापुढे बाहेरील कोणत्याही भागातील कोरोनाग्रस्त मृतदेह सारसोळे स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी आणला तर महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या टेबलावर तो मृतदेह नेवून ठेवण्याचा इशारा यावेळी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी दिला आहे.
नवी मुंबईतील अन्य गावातील स्मशानभूमीमध्ये ग्रामस्थांव्यतिरिक्त सहसा बाहेरील कोणाचा अंत्यविधी करू देत नाही. सारसोळेच्या ग्रामस्थांनी सुरूवातीपासूनच मनाचा मोठेपणा दाखवित बाहेरील लोकांच्या मृतदेहांवर सारसोळे स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मनाचा मोठेपणा दाखवित परवानगी दिली. कोरोना रूग्णाचे प्रमाण दिसू लागल्यावर नवी मुंबईत कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बनविण्याची मागणी सारसोळेच्या मनोज मेहेर यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व महापालिका आयुक्तांकडे केली आहे व आजही या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे.
सारसोळेची स्मशानभूमी एका कोपऱ्यात नवी मुंबईतील कोणत्याही भागातील कोरोनाग्रस्त मृतदेहांवर सारसोळेच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणले जावू लागले. विशेष म्हणजे पालिकेचेच अधिकारी नवी मुंबईत इतक्या स्मशानभूमी असतानाही सारसोळेच्या स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येथे पाठवतात. स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून अंत्यविधी करण्यास भाग पाडतात. ही बाब सारसोळेच्या ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थ संतप्त झाले. मनोज मेहेर यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना याबाबत तक्रार करताच मंत्रालयातून कोरोनाग्रस्त मृतदेहांवर त्यांच्या निवासी भागातच अंत्यविधी करावेत असे मेलद्वारे मनोज मेहेर यांना व नवी मुंबई महापालिकेलाही कळविले. कोरोननाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यावर स्मशानभूमी सॅनिटाईस करण्यास पालिका टाळाटाळ करत असे. स्मशानभूमीतील कामगारांना कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाही. मनोज मेहेर यांनी पालिकेकडे पाठपुरावा केल्यावर स्मशानभूमीतील कामगारांना पीपीई किट व इतर सुविधा दिल्या. काही दिवसापूर्वी ठेकेदाराने सॅनिटाईज करण्यासाठी मशिन आणून ठेवले.
बुधवारी मध्यरात्री मुंबईनिवासी एका कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहावर अंत्यविधी न करता परत सारसोळेच्या ग्रामस्थांनी परत पाठवून दिले. गुरूवारी सकाळी अंत्यविधीसाठी खालापूरनिवासी एका कोरोनाग्रस्ताच्या मृतदेह सारसोळे स्मशानभूमीत आणला जाणार असल्याचे समजताच सारसोळेच्या युवकांच्या संतापाचा उद्रेक झाला. मनोज मेहेर, निलेश तांडेल, विशाल मेहेर, प्रतिक तांडेल, गणेश यांच्यासह अन्य युवकांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली व थेट सारसोळे स्मशानभूमीलाच टाळे ठोकत फोटो महापालिका अधिकाऱ्यांना पाठवून दिले. नवी मुंबईत सर्वत्र स्मशानभूमी असताना सारसोळेच्याच स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त अंत्यविधीसाठी पालिका व हॉस्पिटलवाले का पाठवितात, यापुढे बाहेरील कोणताही कोरोनाग्रस्त मृतदेह आल्यास तो उचलून बाजूच्याच नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयात विभाग अधिकाऱ्याच्या टेबलवर ठेवणार असल्याचे यावेळी सारसोळेच्या संतप्त युवकांनी सांगितले. साररसोळे युवकांनी स्मशानभूमीला टाळे ठोकल्याचे वृत्त कळताच सर्वत्र खळबळ उडाली. काही पालिका अधिकाऱ्यांच्या व समाजसेवकांच्या मध्यस्थीने युवकांची समजूत काढत टाळे काही वेळाने काढले असले तरी यापुढे बाहेरील कोरोनाग्रस्त मृतदेह आल्यास पालिकेत नेण्याचा आमचा निर्धार कायम असल्याचे मनोज मेहेर यांनी सांगितले. पालिका अधिकारी व रूग्णालय व्यवस्थापन जाणिवपूर्वक सारसोळेच्याच स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतदेह पाठवित असल्याची तक्रार मनोज मेहेर यांनी तात्काळ मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना करताना घडला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
:-