
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये नवी मुंबईचा देशात तिसरा तर राज्यात पहिला क्रमांक
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईला तिसरे तर महाराष्ट्र राज्यात पहिले मानांकन मिळाले. याचे सर्व श्रेय हे नवी मुंबईतील समस्त नागरिकांचे असल्याने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या भाजपाच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. यंदा नवी मुंबईला देशात तिसरे व राज्यात पहिला क्रमांक आल्याने संपूर्ण नवी मुंबईमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानातंर्गत नवी मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम राबविले गेले. शाळा-कॉलेजच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन करण्यात आले. महापालिका अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, साफसफाई कर्मचारी २४ तास काम करून आपले कर्तव्य बजावत आहेत. अनेक संस्था, सामाजिक संघटना, बचत गट, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, युवा वर्ग व विद्यार्थी यांनी स्वच्छ नवी मुंबईसाठी पुढाकार घेतला. लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याचे सर्व श्रेय हे नवी मुंबईकरांसमवेत या सर्वांना जाते. नवी मुंबईला मिळालेले हे यश या सर्वामुळे असल्याने त्यांचे मी मनापासून आभार मानते व अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत माझ्या आमदार निधीतूनही प्रत्येक प्रभागात सार्वजनिक स्वच्छतागृहे देण्यात आली आहेत. तसेच खास महिलांकरिताही ‘बसेस स्वच्छता गृह’ उभारण्यात येत आहेत. आज आपण तिसऱ्या क्रमांकावर जरी असलो तरी पुढील वर्षी आपण नक्की पहिल्या क्रमांकावर असू, असा विश्वास भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला.