
https://www.nmmchealthfacilities.com – ‘रिअल टाईम अपडेट डॅशबोर्ड’ कार्यान्वित
नवी मुंबई : कोव्हीड 19 वरील उपचारासाठी कोव्हीड केअर सेंटर (CCC), डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC) व डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (DCH) अशी त्रिस्तरीय सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रूग्णालय सुविधांमध्ये कोणत्या रूग्णालयांमध्ये, कोणत्या प्रकारचे, किती बेड्स उपलब्ध आहेत याची अद्ययावत माहिती नागरिकांना सहजपणे मिळून त्यांना बेड्स उपलब्धतेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रिअल टाईम अपडेट डॅशबोर्ड’ तयार करण्यात आला आहे.
त्याव्दारे आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले सर्वसाधारण बेड्स, ऑक्सिजन बेड्स, आय.सी.यू. बेड्स तसेच व्हेंटिलेटर याबाबतची रूग्णालयनिहाय अद्ययावत माहिती https://www.nmmchealthfacilities.com या लिंकवर एका क्लिकव्दारे त्वरित उपलब्ध होणार आहे. याव्दारे नागरिकांना सद्यस्थितीत कोणत्या रूग्णालयात, कोणत्या प्रकारचे, किती बेड्स उपलब्ध आहेत हे लगेच कळणार असून त्यामुळे बेड्स उपलब्धतेबाबतची माहिती मिळण्यात येणा-या अडचणी दूर होणार आहेत.
महानगरपालिकेमार्फत हा ‘रिअल टाईम अपडेटेड डॅशबोर्ड’ तयार करण्यात आला व त्याची लिंक महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 वर उपचार करणा-या सर्व रूग्णालयांना देण्यात आली. त्या रूग्णालयांमध्ये रूग्ण दाखल झाला अथवा उपचारानंतर बरा होऊन घरी गेला तर त्याची नोंद त्वरित डॅशबोर्डच्या लिंकवर करण्याचे निर्देश रूग्णालय व्यवस्थापनांना देण्यात आले. त्याची आठवडाभर चाचणी घेण्यात आली व महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी त्याचे निरीक्षण केले आणि आता हा डॅशबोर्ड नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
या डॅशबोर्डवर मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळणा-या कोव्हीड 19 पॉझिटिव्ह रूग्णांसाठी डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC) व डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (DCH)मधील एकूण उपलब्ध बेड्स, त्यात उपचारासाठी रूग्ण दाखल असलेले बेड्स तसेच शिल्लक बेड्स यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच सौम्य लक्षणे आढळणा-या व लक्षणे नसलेल्या कोव्हीड 19 पॅझिटिव्ह रूग्णांसाठी तसेच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अतिनिकटच्या संपर्कातील व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष व्यवस्था असलेल्या कोव्हीड केअर सेंटर (CCC) येथील बेड्सची माहितीही उपलब्ध आहे.
याशिवाय रूग्णालय सुविधेतील बेड्समध्ये अधिक वाढ करण्याची कार्यवाही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यापूर्वीच सुरू केलेली असून आय.सी.यू. बेड्सची कमतरता दूर करण्यासाठी नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाशी 200 आय.सी.यू. बेड्स व 80 व्हेंटिलेटर्स उपलब्धतेबाबतचा करार करण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 आय.सी.यू. बेड्स व 20 व्हेंटिलेटर्सची सुविधा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेली असून उर्वरित 150 आय.सी.यू. बेड्स व 60 व्हेंटिलेटर्स टप्प्याटप्प्याने 20 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहेत.
त्याचप्रमाणे, सेक्टर 24 तुर्भे येथील राधास्वामी सत्संग आश्रम येथे 450 ऑक्सिजन बेड्स तसेच एक्सपोर्ट हाऊस, एमीएमसी मार्केट, तुर्भे येथे 475 ऑक्सिजन बेड्स सुविधा असलेले डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरचे (DCHC) काम अंतिम टप्प्यात असून 31 ऑगस्टपर्यंत रूग्णसेवेसाठी उपलब्ध होईल. याशिवाय सिडको एक्झिबिशन सेंटर येथे उर्वरित 600 बेड्स ऑक्सिजन सुविधायुक्त करण्याचे प्रस्तावित असून 10 सप्टेबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. अशाप्रकारे रूग्णालयीन सुविधांमध्ये वाढ करण्यासोबतच या रूग्णालयीन सुविधा नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकडे आयुक्त श्री. अभिजीत बांगर काटेकोर लक्ष देत असून महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड रूग्णालयांमधील बेड्स उपलब्धतेची अद्ययावत माहिती नागरिकांना सहजपणे उपलब्ध होण्याकरिता https://www.nmmchealthfacilities.com या लिंकव्दारे ‘रिअल टाईम अपडेट डॅशबोर्ड’ उपलब्ध करून दिला जात आहे, त्याचा नागरिकांनी उपयोग करावा असे आवाहन करण्यात येत आहे.