
नवी मुंबई : सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्याची मागणी नवी मुंबईचे महापालिकेचे माजी ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहराचा देशपातळीवर स्वच्छता सर्वेक्षणात तिसरा व राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे. सध्या देशामध्ये नवी मुंबई शहराचा प्रथम क्रमांक येण्यासाठी महापालिका प्रशासन अथक प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीनेच कोठेतरी या अभियानाला हातभार लागावा व खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण व्हावी या हेतूने आपल्यास हे निवेदन देत आहे. महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायट्यांना गेल्या काही वर्षात कचरा डब्ब्याचे वितरण झालेले नाही. मागील पालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यावर पहिल्याच वर्षी (२०१५-१६) गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा डब्ब्यांचे सरसकट वितरण करण्यात आले. त्यानंतर असा प्रकार झालाच नसल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
मोजक्याच सोसायट्यांना कचरा डब्बे वितरीत केले जातात, सरसकटपणे सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा डब्बे देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचे डब्बे तुटले होते, कोठे फाटले आहे. तर कचरा डब्बे नामधारी झाले असून खालच्या तळाच्या दिशेनेही नामशेष झाले आहे. कचरा डब्ब्याची झाकणेही तुटली आहेत. यामुळे कचरा संकलनासाठी वाहने आल्यावर ते डब्बे गाडीकडे घेवून जाताना कचरा सोसायटी आवारात तसेच सोसायटी आवाराबाहेर गाडी उभी केलेल्या ठिकाणी तो कचरा दररोज पडत असतो. त्याची दुर्गधी सोसायटीतील रहीवाशांना तसेच रस्त्यावर ये-जा करणाऱ्या रहीवाशांना सहन करावी लागते. नेरूळ सेक्टर सहामधील व सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिका प्रशासनाकडून कचरा डब्बे वितरीत करण्यात यावे, तसेच मागील सहा वर्षात सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांना केवळ कागदावरच नाही तर प्रत्यक्षात खरोखरीच वितरीत झाल्या आहेत का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.