
नवी मुंबई : सारसोळे गावातील मच्छि मार्केटजवळील अन्य फेरीविक्रेत्यांवर कारवाई करून सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहाची बकालपणातून मुक्तता करण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी नेरूळ विभाग कार्यालयाकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सारसोळे गावात ग्रामस्थांसाठी मच्छि मार्केट आहे. खाडीमध्ये मासेमारी केलेले मासे व मुंबई-कुलाबावरून या मार्केटमध्ये मासे आणून या मार्केटमध्ये माशांची विक्री स्थानिक आगरी-कोळी ग्रामस्थ करत असतात. तथापि या मार्केटच्या सभोवताली अन्य फेरीविक्रेत्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. हे फेरीविक्रेते बेकायदेशीररित्या विनापरवाना व्यवसाय करत असुन ते स्थानिक नाहीत. गोवंडी-मानखुर्द या भागातून ते या ठिकाणी फेरीव्यवसाय करत आहेत. यामुळे सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसराला बकालपणा आला असून संबंधित फेरीविक्रेत्यांच्या व्यवसायिक अतिक्रमणामुळे स्थानिक रहीवाशांना ये-जा करण्यास अडथळे निर्माण होवू लागले आहे. महापालिका प्रशासनाने हे अतिक्रमण तातडीने हटवून परिसराला फेरीविक्रेत्यांच्या विळख्यातून मुक्त करावे, तसेच पुन्हा हे फेरीवाले या ठिकाणी व्यवसायासाठी येवू नये यासाठी दर दोन दिवसांनी या भागात कारवाई करण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी नेरूळ विभाग कार्यालयाकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.