
नवी मुंबई : जुईनगर-नेरूळ परिसरातील कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या महिलांचा काँग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या अरूण भांडेकर यांच्यानेतृत्वाखाली साडी-चोळी, नारळ आदी देवून ओटी भरण्याचा कार्यक्रम घरोघरी जावून करण्यात आला. इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती विद्या भांडेकर यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात महिलांना कोरोनाची लागण झाली, अशा वेळी रूग्णालयात कोरोनाचा पराभव करून घरी परतलेल्या खऱ्या अर्थाने कोरोना योध्दा ठरलेल्या या महिलांचा दिपावलीच्या काळात साडीचोळी, नारळाचे ओटी भरून त्यांचा सन्मान करण्याची संकल्पना कामगार नेते रवींद्र सावंत यांनी काँग्र्रेसच्या नेरूळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडली व विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली.
नेरूळ-जुईनगर भागातील या कोरोना योध्दा महिलांचा काँग्रेसच्या वतीने घरोघरी जावून ओटी भरून सत्कार करण्यात आला. यावेळी भांडेकर यांच्यासमवेत सौ. शेवंता मोरे, सौ. मंगला बागडे, सौ. सारीका अकुंश धोंडे, सौ. श्वेता सुशांत लंबे, सौ. मृणाली बागडे, सौ. अनिता गांर्गुडे, सौ. पूनम कांबळे आदी महिला ओटी भरण्याच्या अभियानात सहभागी झाल्या होत्या. दिपावलीच्या काळात कोरोना योध्दा महिलांचा काँग्रेसने केलेल्या सत्काराचीच नेरूळ-जुईनगरमध्ये चर्चा सुरू आहे.