
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोना आटोक्यात आणण्यात नवी मुंबई महापालिका प्रशासनाला गेल्या काही दिवसापासून यश येवू लागले आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांची आकडेवारी दररोज शंभरच्या आता येत असतानाच बुधवारी कोरोनाचे १३१ रूग्ण आढळून आले आहेत. डिसेंबर व जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच नवी मुंबईतून कोरोना हद्दपार करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगरांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासन नवी मुंबई शहरात शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
बुधवारी दिवसभरात आढळून आलेल्या १३१ कोरोना रूग्णांमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण बेलापुर विभागात ३१ तर नेरूळ व ऐरोली विभागात प्रत्येकी २१ कोरोना रूग्ण आढळले आहेत. कोपरखैराणे विभागात १७, तुर्भे विभागात १४, वाशी विभागात १३, घणसोली विभागात ११ तर दिघा विभागात ३ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसापासून शंभरच्या आत येणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी गुरूवारी १३१ झाल्याने थोडेसे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना अजून शहरातून हद्दपार झालेला नसतानाही नवी मुंबईकरांकडून मास्क न घालणे, सॅनिटाईज वेळेवर न करणे, गर्दीच्या ठिकाणी वावरणे यासह कोरोनाबाबत कोणतेही पथ्य पाळले जात नसल्याने नवी मुंबईत कोरोनाला पोषक वातावरण पुन्हा मिळू लागल्याची भीती नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.