
स्वयंम न्युज व्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : साठ –सत्तर-ऐशीच्या घरात गेल्या काही दिवसापासून अडखळत असणाऱा कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा गेल्या दोन ते तीन दिवसापासून दीडशेचा आकडा पार करू लागल्याने नवी मुंबईकरांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
कोरोना रूग्णांची संख्या कमी होवू लागल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून कोव्हिड सेंटरही बंद करण्यात येवू लागली आहेत. दररोजचा कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा शंभराहून कमी अगदी साठ-सत्तर-ऐशीच्या घरात येवू लागल्याने कोरोनामुक्त नवी मुंबई हे चित्र लवकरच दिसणार असल्याचा आशावाद नवी मुंबईकरांकडूनही व्यक्त केला जावू लागला होता. तथापि नवी मुंबई शहरामध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दीडशेहून अधिक येवू लागल्याने कोरोनाच्या उद्रेकाला पुन्हा सामोरे जावे लागणार की काय अशी भीती पुन्हा एकवार नवी मुंबईकरांकडून व्यक्त केली जावू लागली आहे.
शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) नवी मुंबई शहरामध्ये १६८ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. यामध्ये बेलापुर विभागामध्ये सर्वाधिक ४९ कोरोना रूग्ण तर नेरूळ विभागामध्ये ३५ रूग्ण आढळून आले आहेत. कोपरखैराणे विभागात २२, वाशी विभागात १९, तुर्भे विभागात १८, घणसोली विभागात १६, ऐरोली विभागात ८ तर दिघा विभागात १ कोरोनाचा रूग्ण आढळून आला आहे.
नवी मुंबईच्या अनेक भागात मास्कविना फिरताना नवी मुंबईकर मोठ्या संख्येने फिरताना पहावयास मिळत आहे. नाक्यानाक्यावर, कॉर्नरवर पुन्हा चावडी गप्पा रंगल्या असून सार्वजनिक ठिकाणी तसेच सोसायटी आवारातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. एपीएमसी मार्केटमध्येही गर्दीचा कोलाहल वाढू लागला आहे. एकंदरीत कोरोना रूग्ण संख्येचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने कोरोनाचा उद्रेक होणार की काय अशी भीती आता सर्वत्र व्यक्त केली जावू लागली आहे.
*****
कोरोना थांबविण्याची आता पालिका प्रशासनासह पोलिसांची जबाबदारी
कोरोनाची पुन्हा वाढती आकडेवारी ही नवी मुंबई शहरासाठी व नवी मुंबईकरांसाठी चिंतादायी बाब आहे. पालिका प्रशासनाने कोरोनाचा उद्रेक होण्याची वाट न पाहता आता विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात कठोरातील कठोर अभियान राबवावे. नवी मुंबईत एकही नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक कोरोना जाईपर्यत विना मास्क फिरणार नाही यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यत राबवावी. नाक्यानाक्यावर, चौकाचौकात वाढणाऱ्या गर्दीमुळे तसेच मार्केट परिसरातील गर्दीमुळे कोरोना उद्रेकाची शक्यता पाहून पोलिसांनी गर्दी पांगवावी, पुन्हा तेथे गर्दी दिसल्यास कायद्याचा झटका द्यावा की जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल. कोरोना उद्रेक रोखण्यासाठी महापालिका व पोलिसांना महत्वाची भूमिका बजवावी लागणार असून नवी मुंबईकरांनीही कोरोनाविरोधातील पथ्य पालन करून कोरोना नियत्रंणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
श्री. सुरज पाटील
भाजपाचे युवा नेतृत्व
नवी मुंबई