
स्वयंम न्युज व्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च २०२१ अखेरपर्यंत देण्याचा सिडकोचा मानस
नवी मुंबई : सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्थानक, खारघर बस टर्मिनस, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल (प.) बस आगार, खारघर, सेक्टर-४३ आणि तळोजा, सेक्टर-२१, २८, २९, ३१ व ३७ या बांधकाम स्थळांना भेट दिली. २० नोव्हेंबर रोजी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी उपरोक्त बांधकाम स्थळांना भेट देऊन बांधकाम कार्याचा आढावा घेतला. सदर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च २०२१ अखेरीस देण्याचा मानस असल्याचे व नव्या वर्षात सिडकोच्या घरांची विक्री करण्याच्या योजनादेखील जाहिर करण्याचा सिडकोचा मानस असल्याचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थपाकीय संचालक यांनी यावेळी स्पष्ट केले.
या वेळी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांसमवेत के. एम. गोडबोले, मुख्य अभियंता (नवी मुंबई), संजय चोटालिया मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), सिडकोचे प्रकल्पाशी संबंधित अधिकारी, कंत्राटदार व सल्लागार देखील उपस्थित होते.
सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर असून या योजनेमुळे नजीकच्या काळात अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे आणि नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्याचे स्वप्न साकार होणार आहे, असे उद्गार या भेटीदरम्यान डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले. सिडकोने नेहमीच अत्यंत किफायतशीर दरात घरांची विक्री केली आहे. त्यामुळे सदर महागृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून सिडको प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘सर्वांसाठी घरे’ या उद्दिष्टपूर्तीसाठी मोठे योगदान देणार असल्याचे मतही उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे सदर गृहप्रकल्प हे परिवहन केंद्रीत असल्याने नागरिकांचा घर ते कामाचे स्थळ यातील प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
सिडकोतर्फे डिसेंबर, २०१८ मध्ये ‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा नोडसह विविध नोड्मधील बस डेपो, ट्रक टर्मिनस, रेल्वे स्थानक फोरकोर्ट एरिया परिसरामध्ये घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर गृहनिर्माण योजना ही एकूण ४ पॅकेजमध्ये साकारण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरिता घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सर्व बांधकाम स्थळांना भेट देऊन उपाध्यक्ष तथा व्यवस्थाकीय संचालक, सिडको यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.