
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ८६ मधील सारसोळे गावात नव्याने मल:निस्सारण वाहिन्या टाकण्याच्या कामास बु्धवारी (दि. २५) सकाळी शुभारंभ झाला. नगरसेवक निधीतून प्रभागातील तीन ठिकाणच्या मल:निस्सारण वाहिन्या पूर्णपणे या कामामध्ये बदलण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या माजी नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी दिली.
सारसोळे ग्रामस्थांनी मल:निस्सारण वाहिन्या जुनाट झाल्याने बदलण्याची सतत मागणी केल्याने नगरसेवक निधीतून या वाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. महापालिका सभागृह विसर्जित होण्यापूर्वीच या कामाला मंजुरी मिळाली होती. तथापि मार्चच्या मध्यावर कोरोना महामारीच्या लाटेचा उद्रेक झाल्याने महापालिका प्रशासनाकडून विकासकामांना पूर्णपणे स्थगिती देण्यात आली होती. कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताच विकासकामांना महापालिका प्रशासनाने टप्याटप्याने शुभारंभ केला आहे. त्यात बुधवारी सकाळी सारसोळे गावातही मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याच्या कामाचा समावेश होता. या कामाचे उद्घाटन माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी न करता स्थानिक रहीवाशांच्या हस्ते केले. स्थानिक रहीवाशांनी भरलेल्या करातूनच विकासकामे मार्गी लागत असल्याने उद्घाटनावरही हक्क त्यांचाच असल्याचे जयश्री ठाकूर यांनी सांगितले.