
नवी मुंबई : नेरूळमधीलकै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक कला केंद्रातील (ग्रंथालय) समस्या निवारणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक व विभागप्रमुख रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ मध्ये महापालिकेचे कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक कला केंद्र (ग्रंथालय) आहे. या कला केंद्राच्या सुरूवातीला असणारे प्रवेशद्वार तुटलेले आहे. या प्रवेशद्वाराची दुरूस्ती तसेच डागडूजी होणे आवश्यक आहे. पावसाळ्यात झालेल्या वादळी पावसामुळे येथील झाडांची पडझड झालेली आहे, त्यामुळे सांस्कृतिक कला केंद्र (ग्रंथालय) आवाराला बकालपणा आलेला आहे. पडझड झालेली झाडे अद्यापि तेथून हटविण्यात आलेली नाहीत. जी थोडी झाडे हटविली, त्याची मुळेही तिथे पडलेली आहेत. चार महिने झाले तरी सांस्कृतिक कला केंद्र (ग्रंथालय) आवारातील पडझड झालेली झाडे हटविण्याची तसदी अजूनही संबंधितांकडून घेण्यात आलेली नाही. ग्रंथालयातील सीसीटीव्ही बंद आहेत. ते सुरू करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक कला केंद्राला (ग्रंथालय) महापालिका प्रशासनाकडून सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. ग्रंथालय सुरू करण्याची महापालिका प्रशासनाने घाई केली असली तरी ग्रंथालयात येणाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. ग्रंथालयात सॅनिटायसर्झ उपलब्ध नाही. शासन नियमानुसार ग्रंथालयात टेबल व अन्य वापरातील वस्तूंवर जंतुनाशक फवारणी होणे आवश्यक आहे. तसे या ठिकाणी केले जात नाही. ग्रंथालयात येणाऱ्यांसाठी हात स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सॅनिटायझिंगची कोणतीही व्यवस्था करून देण्यात आलेली नाही. ग्रंथालयातलगत थेट दुचाकी वाहने येवू लागल्याने ग्रंथालयाला वाहन पार्कींगचे स्वरूप आले आहे. कला केंद्रात (ग्रंथालय) येणाऱ्यांची वाहने प्रवेशद्वाराबाहेरच उभी करणे आवश्यक आहे. कला केंद्र आवारात समस्यांचा डोंगर असल्याने बकालपणाच्या विळख्यात हे कला केंद्र अडकले आहे. पालिका आयुक्तांनी स्वत: या ठिकाणी भेट दिल्यास समस्यांचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास येईल असे सांगताना शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी कला केंद्र आवारातील सर्वच समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.