
नवी मुंबई : गेली 5 वर्षे आम्ही केवळ प्रशासनदरबारी लेखी पाठपुरावा व पालिका अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीच घेत आहोत. समस्या सुटत नाही. समस्यांचे गांभीर्य पालिका प्र्रशासनाच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे कोठेतरी संयम व सहनशीलतेला मर्यादा या पडतातच. समस्यांचे निवारण न झाल्यास आम्हाला स्थानिक जनतेसमवेत पालिका मुख्यालयासमोर निदर्शने अथवा एकदिवसीय उपोषण हा लोकशाहीतील आंदोलनाचा पर्याय स्विकारावा लागेल व याची जबाबदारी पूर्णपणे महापालिका प्रशासनाची व विकासकामे करण्यास चालढकल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची राहील असा इशारा भाजपाचे नेरूळमधील नेते गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिला आहे.
ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे साप्ताहकि भेटीदरम्यान महापालिका मुख्यालयात आयुक्त अभिजित बांगर यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांच्यासमवेत असणाऱ्या भाजपच्या गणेश भगत यांनी प्रभागातील समस्या पाठपुरावा करूनही सुटत नसल्याची स्पष्टपणे नाराजी व्यक्त करताना पालिका मुख्यासमोर निदर्शने अथवा एक दिवसाचे उपोषण करण्याचा इशारा गणेश भगत यांनी दिला आहे.
महापालिका प्रभाग 96मधील नागरी समस्यांच्या निवारणाकरीता व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याकरीता गणेश भगत यांनी यापूर्वी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची पाच वेळा भेट घेवून निवेदनही दिलेले आहे. महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावाही केलेला आहे. एकदा नव्हे तर अनेकदा लेखी निवेदनेही प्रशासनास सादर केलेली आहेत. भेटीगाठी घेवून समस्येचे गांभीर्यही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्नही केलेला आहे. आम्ही आपल्याकडे तसेच प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाच-दहा वेळा नाही तर अजून पाचशे वेळा हेलपाटे मारू, आम्हाला पाठपुरावा करण्यात तसेच अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारण्यात व्यक्तिगत काहीही कमीपणा नाही. पण स्थानिक जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत असे गणेश भगत यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला सांगितले.
महापालिका प्रशासनाकडून समस्या सोडविण्यात महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबामुळे स्थानिक रहीवाशांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. नेरूळ सेक्टर 16 ए प्रथमेश सोसायटीमागील रस्त्याचे डांबरीकरण करणेबाबत, नेरूळ सेक्टर 16 ए शिवनेरी आणि परिमल सोसायटी मल:निस्सारण वाहिनी बदलणेबाबत, नेरूळ सेक्टर 16 छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील 5 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या मुसळधार पाऊसामध्ये झाडांची पडझड होवून तुटलेली खेळणी दुरूस्त करणेबाबत, वसई विरार महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेने नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणी बिल भरण्याकरिता पेटीएम, फोन पे, गुगल पे सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेनेही नवी मुंबईकरांना मालमत्ता कर आणि पाणी बिल भरण्याकरिता पेटीएम, गुगल पे, फोन पे सुविधा उपलब्ध करून देणेबाबतच्या समस्यांचे निवेदन गणेश भगत यांनी गुरूवारी महापालिका आयुक्तांना सादर केले.