
नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रंथालय व अभ्यासिकांमध्ये राज्य सरकारच्या एसओपीची अंमलबजावणी करण्याची मागणी युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपयुवा विधानसभा अधिकारी निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नुकतेच नवी मुंबई शहरातील ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केल्या आहेत. तथापि अभ्यासिका व ग्रंथालये सुरू करताना महापालिका प्रशासनाकडून कोरोना पार्श्वभूमीवर काळजी घेण्याविषयी कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे. ग्रंथालय व अभ्यासिकामध्ये राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना एसओपीच्या माध्यमातून काही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांना महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. अनेक ग्रंथालयातील सीसीटीव्ही बंद आहेत. ते सुरू करणे गरजेचे आहे. काही ग्रंथालय व अभ्यासिकांना महापालिका प्रशासनाकडून सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याचे निखिल मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
ग्रंथालय सुरू करण्याची महापालिका प्रशासनाने घाई केली असली तरी ग्रंथालयात येणाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. ग्रंथालयात सॅनिटायसर्झ उपलब्ध नाही. शासन नियमानुसार ग्रंथालयात टेबल व अन्य वापरातील वस्तूंवर जंतुनाशक फवारणी होणे आवश्यक आहे. तसे या ठिकाणी केले जात नाही. ग्रंथालयात येणाऱ्यांसाठी हात स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सॅनिटायझिंगची कोणतीही व्यवस्था करून देण्यात आलेली नाही. काही ग्रंथालयातलगत थेट दुचाकी वाहने येवू लागल्याने ग्रंथालयाला वाहन पार्कींगचे स्वरूप आले आहे. अभ्यासिका व ग्रंथालयात येणाऱ्यांची वाहने प्रवेशद्वाराबाहेरच उभी करणे आवश्यक आहे. ठिकठिकाणच्या अभ्यासिका व ग्रंथालय आवारात समस्यांचा डोंगर असल्याने बकालपणाच्या विळख्यात हे अभ्यासिका व ग्रंथालय अडकले आहे. पालिका आयुक्तांनी स्वत: या ठिकाणी भेट दिल्यास त्यांना समस्यांचे गांभीर्य निदर्शनास येईल असे सांगून युवा सेनेच्या निखिल मांडवे यांनी ग्रंथालय व अभ्यासिका आवारातील सर्वच समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.