
नवीन पनवेल : गेल्या काही वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या गोंडस नावाखाली नवीन पनवेल आणि करंजाडे शहरातील नागरिकांना सिडको फसवत असून मूलभूत हक्क असलेल्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेवून पनवेल संघर्ष समितीने धडक देत सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारला.
नवीन पनवेल सिडको विभागाचे अधीक्षक सीताराम रोकडे, पाणी पुरवठा अभियंता सरोदे, बांधकाम अभियंता पटेल, नोड ऑफिसर मुलाणी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता प्रशांत पांढरपट्टे तर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, नवीन पनवेल शहर अध्यक्ष अभिजित पुळेकर, महिला अध्यक्ष निकिता जोशी, उपाध्यक्ष राजेश्वरी बांदेकर तालुका महिला उपाध्यक्ष प्रा. चित्रा देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, स्वप्नंकुंज सोसायटीच्या स्मिता राजेश, लता जयराम, आणि माधुरी माडणकर तसेच करंजाडे चंद्रकांत गुजर, कुणाल लोंडे, देविदास पाटील, विजय कावीस्कर, बाळासाहेब आवारी, उमेश रघुनाथ, विकास गांजाळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.
नवीन पनवेल आणि करंजाडे येथील नागरी समस्यांचा निपटारा करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने सातत्याने सिडकोकडे तगादा लावला आहे. कोरोनापूर्व काळात करंजाडेसाठी संघर्ष समितीने मंजूर करून घेतलेल्या 38 कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा बैठकीत घेतला.
सीताराम रोकडे यांनी करंजाडे आणि नवीन पनवेलच्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, पाणी प्रश्न, पथदीवे, गटारांना झाकणे, हायमास्ट दिवे आदी कामांबद्दल सविस्तर चर्चा करून प्रत्यक्षात कृतीची जोड देवून ही कामे सुरू करताना पाणी पुरवठा, रस्त्याची डागडुजी, गटारांवरील झाकणे 15 दिवसात दिसतील. तर येत्या तीन महिन्यात करंजाडे येथील दोन. बगीचे लोकांना खुली करण्यात येतील असे सांगितले.
याशिवाय उर्वरित कामांना लवकरच चालना देण्यात येईल. या बैठकीनंतर पनवेल संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सेक्टर 1 मधील स्नेहकुंज सोसायटीला भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.