
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदेंसह, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटिवारांकडे रवींद्र सावंत यांचा पाठपुरावा
नवी मुंबई : कोरोना काळात रूग्णालयीन सेवेत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या बीव्हीजी ठेकेदारकडील बहूउद्देशीय सफाई कामगारांचा ठोक मानधनावरील सेवेत अथवा थेट पालिका आस्थापनेवर समावेश करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
मार्च २०२० पासून आजतागायत कोरोना महामारीशी संघर्ष करत बीव्हीजी ठेकेदाराकडे कार्यरत असणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातील रूग्णालयीन सेवेतील बहूउद्देशीय सफाई कामगारांनी अतुलनीय कामगिरी बजावत कोरोना रूग्णांची सेवा बजावलेली आहे. स्वत:च्या जिविताची पर्वा न करता या सफाई कामगारांनी कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये महापालिका प्रशासनाला साथ दिलेली आहे. या सेवेची पालिका प्रशासनाकडून कोठेतरी दखल घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या रूग्णालयीन सेवेत या बहूउद्देशीय सफाई कामगारांची सेवा महत्वपूर्ण आहे. नवी मुंबई महापालिका स्थापनेपासून बहूउद्देशीय सफाई कामगार काम करत आहेत. या सफाई कामगारांनी केलेल्या सफाई व स्वच्छ कामामुळे महापालिका प्रशासनाला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात सलग दोन वेळा राज्यात प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळण्यास हातभार लागला होता, हे आपणास विसरून चालणार नाही. कोरोना काळात त्यांनी बजावलेल्या सेवेने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. इतके करूनही या कामगारांना वेतनही वेळेवर मिळत नाही. या बहूउद्देशीय सफाई कामगारांना बीव्हीजी ठेकेदाराच्या जोखडातून मुक्त करून पालिका प्रशासनाने बहूउद्देशीय सफाई कामगारांचा ठोक मानधनावरील सेवेत अथवा पालिका आस्थापनेवर समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे मागणीचा सकारात्मक विचार करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला तसे स्पष्टपणे निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे तसेच राज्य सरकारकडेही केली आहे.