
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात रक्तदान शिबिर आयोजण्याची संख्या कमी झाली असून रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांचा उत्साहही मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे. कोरोना टेस्टविषयी असलेल्या समज-गैरसमजामुळे स्वेच्छा रक्तदानासाठी येणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी होत असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना रूग्णांचा आकडा वाढू लागला आहे. आरोग्यविषयक अन्य उपचार, शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर रक्ताचा स्टॉक नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनातर्फे इच्छुकांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर नेरुळमधील पर्यावरणप्रेमी असलेले सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भगत यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १ डिसेंबर आपल्या १४ व्या लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला.
त्याचबरोबर रवींद्र भगत व त्यांची पत्नी सौ. उषा रवींद्र भगत यांनी वाशी येथील डिसायर सोसायटी येथील अनाथ मुलांना चॉकलेट, बिस्कीट आणि धान्य वाटपही केले. कोरोना काळात रक्तदान व अनाथ मुलांना चॉकलेट, बिस्कीट व धान्य वाटप करून भगत दाम्पत्याचे कार्य हे आजच्या युवापिढीला प्रेरणादायक असेच म्हणावे लागेल. यापूर्वीही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, ग्रंथालयांना पुस्तकवाटप यासह विविध सामाजिक उपक्रम राबवित भगत दापंत्याने समाजाप्रती असलेले सामाजिक बांधिलकीचे भान प्रत्यक्ष कृतीतून जोपासत इतरांपुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे व इतरांसाठी हे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार नवी मुंबईचे विकासपर्व, त्यागमूर्ती म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱे ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी काढले आहे.