
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबई महानगरपालिकेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची सेवा कायम व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे चिटणिस संतोष शेट्टी व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदन सादर केले.
महापालिका प्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची सेवा कायम व्हावी यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत हे महापालिका प्रशासनापासून ते मंत्रालयापर्यत सतत प्रयत्न करत आहेत. रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे विधानभवनातील अधिवेशनातही हा प्रश्न मांडण्यात आलेला आहे. ठोक मानधनावरील कामगारांची सेवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम झाल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी निवेदनातून व प्रत्यक्ष भेटीगाठीतून महापालिका प्रशासनाच्या व राज्य सरकारच्या निदर्शनासही आणून दिलेले आहे. महापालिका प्रशासनाने रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्याची दखल घेताना याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी नुकताच राज्य सरकारकडेही पाठविला आहे. राज्य सरकारकडून या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी रवींद्र सावंत यांनी मंत्रालयीन पातळीवर मंत्र्यांच्या तसेच महाविकास आघाडीतील नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेवून , त्यांना निवेदनातून साकडे घालून पाठपुरावा कायम ठेवला आहे.
काही दिवसापूर्वीच त्यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचीही भेट घेवून, त्यांना निवेदन सादर करून साकडे घातले आहे. स्थानिक भागात शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनाही निवेदन सादर करून सहकार्य करण्याची गळ घातली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळसाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे, पुनर्वसन मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेट्टीवार यांच्या माध्यमातूनही राज्य सरकारकडे पाठपुरावा कायम ठेवला आहे. मंगळवारी मंत्रालयात जावून नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून या प्रस्तावाला राज्य सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळण्याचे साकडे रवींद्र सावंत यांनी त्यांना घातले. यावेळी महापालिकेतील कामगारही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.