
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ८६च्या वॉर्ड अध्यक्षपदी कॉंग्रेस पक्षाकडून सारसोळे गावचे ग्रामस्थ श्यामसुंदर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी ही नियुक्ती केली आहे. मंगळवारी सकाळी नेरूळमधील कॉंग्रेस कार्यालयात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या हस्ते व कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
प्रभाग क्रं ८६ मध्ये सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील काही परिसराचा समावेश होत आहे. कॉग्रेस पक्षसंघटना बळकट करण्यासाठी वॉर्ड अध्यक्षपदी सारसोळेचे ग्रामस्थ श्यामसुंदर पाटील यांची नियुक्ती करण्याचा निर्णय कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी घेतला व आज एका कार्यक्रमात हे नियुक्तीपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्यामुळे या नियुक्तीपत्र वितरणाच्या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, उपशहरप्रमुख गणेश घाग, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख राजू पुजारी, कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत, कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर, कॉंग्रेसचे नेरूळ तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, सनी डोळस, मनीष महापुरे, सुशांत लंबे आदी उपस्थित होते.