
नवी मुबई :महापालिका प्रभाग ८७ मधील महापालिकेच्या नेरूळ सेक्टर ८ मधील छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान व कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर ८ मध्ये महापालिकेची छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान व कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यान ही दोन उद्याने आहेत. या उद्यानात गेल्या काही दिवसांपासून रात्री मद्यापि व गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे स्थानिक रहीवाशांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. रात्री उद्यानात दारूच्या पार्ट्या व गर्दुल्यांचा नशापानी कार्यक्रम उद्यानात ठिकठिकाणी होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून स्थानिक पोलिसांना उद्यानात गस्त घालण्याबाबत सूचना देणे आवश्यक आहे. उद्यानाच्या डागडूजीबाबत महापालिका प्रशासन दरवर्षी लाखो रूपये खर्च करत असते. हा पैसा स्थानिक करदात्या रहीवाशांचा आहे. उद्यानात वाढलेल्या रात्रीच्या वेळच्या दारूच्या पार्ट्या व गर्दुल्यांचे नशापाणी ही बाब महापालिका प्रशासनाला भूषणावह नाही. त्यामुळे या दोन्ही उद्यानात पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्यानात रात्रीच्या वेळी काय काय प्रकार घडतात याची माहिती पालिका प्रशासनाला उपलब्ध होईल व काही गैरप्रकार घडल्यास पोलिसांना चित्रीकरणही तपासासाठी सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध होतील, असे शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
उद्यानात सुरक्षा रक्षक नसणे ही बाब चिंताजनक आहे. महापालिका आपली महत्वपूर्ण मालमत्ता वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कै. साहेबराव भाऊसाहेब शेरे उद्यानात महापालिका प्रशासनाने सुरक्षा रक्षकच दिलेला नाही. तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानात केवळ सांयकाळी ७ वाजेपर्यतच सुरक्षा रक्षक असतात. उद्यानातील माहिती फलकावर उद्यान रात्री ९ वाजता बंद होत असल्याची माहिती उपलब्ध होते. तथापि ही माहिती केवळ फलकापुरतीच राहीली असून प्रत्यक्ष रात्रीच्या वेळी ही उद्याने बंदच केली जात नसल्याने रात्री या ठिकाणी समाजविघातक शक्तींचा खुलेआमपणे वावर होत असतो. ही उद्याने वेळेवर बंद केल्यास उद्यानात होणाऱ्या दारू पार्ट्या व गर्दुल्यांचे नशापाणी याला आळा बसेल, असा आशावाद रतन मांडवे यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना महामारीमुळे उद्यान गेली काही महिने बंद होते. त्यामुळे उद्यानातील ओपन जीमच्या साधनांचीही पालिका प्रशासनाकडून पाहणी करून डागडूजी होणे आवश्यक आहे. स्वत: येवून उद्यानाला भेट दिल्यास समस्येचे गांभीर्य आयुक्तांच्या निदर्शनास येईल. उद्यानात सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, वेळेवर उद्यान बंद करणे, ओपन जीमच्या साहीत्याची तपासणी याबाबत लवकरात लवकर कार्यवाहीची मागणी रतन मांडवे यांनी केली आहे.