
आंदोलनादरम्यान रास्ता रोको, कृषी विधेयकाची प्रत जाळली, सरकारविरोधात घोषणाबाजी
नवी मुंबई : केंद्र सरकारने सभागृहात चर्चा न करता बहूमताच्या जोरावर मंजुर केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात नेरूळ तालुका कॉंग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनादरम्यान रास्ता रोको, कृषी विधेयकाची होळी आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी यामुळे नवी मुंबईत आज नेरूळ तालुका कॉंग्रेसच्याच आंदोलनाची चर्चा सुरू आहे.
नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात स्थानिक भागातील महिला वर्ग स्वत:हून सहभागी झाल्याने भाजपविरोधातील सर्वसामान्यांचा रोष आता उघडपणे पहावयास मिळाला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव प्रल्हाद गायकवाड, विद्या भांडेकर, नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष दिनेश गवळी,नेरूळ कॉंग्रेसचे सचिव संतोष पाटील, शेवंता मोरे यांच्यासह स्थानिक महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
केंद्र सरकारच्या विरोधात बराच वेळ रस्त्यावर घोषणाबाजी झाली. यामुळे वाहतुक कोंडीही झाली, घोषणाबाजीनंतर केंद्राने मंजुर केलेल्या कृषी विधेयकाची प्रत रस्त्यावर जाळण्यात आली. कॉंग्रेसच्या या आंदोलनाची चर्चा अवघ्या काही वेळातच नवी मुंबईत सुरू झाली.