
नवी मुंबई : ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी वाढत चालल्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रमात मुदतवाढ करण्याची मागणी भाजपच्या प्रभाग ९६च्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी बेलापुर विधानसभा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे.
सध्या निवडणूक आयोगाकडून नवी मुंबईत मतदार नावनोंदणीचा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय घटक मतदारनोंदणीसाठी उत्साहाने कार्यरत आहेत. तथापि ऑनलाईन पध्दतीने मतदारनोंदणी कार्यक्रमात संगणकीय प्रणालीमध्ये विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने मतदारनोंदणी करताना मर्यादा पडत आहेत. मतदार नाव नोंदणींची लिंक ओपन न होणे, मध्येच लींक बंद पडणे, नेट नसणे, माहिती भरत असताना लिंक तुटणे यासह विविध अडचणींचा मतदारनोंदणीत सामना करावा लागत असल्याचे सौ. रूपाली किस्मत भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
ऑनलाईन मतदार नावनोंदणी करताना येत असलेले अडथळे पाहून निवडणूक आयोगाने ऑनलाईन पध्दतीने मतदार नावनोंदणीच्या कार्यक्रमास मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी होण्यास विलंब होत असल्याने महापालिका शाळांमध्ये आपण आपले कर्मचारी आठ दिवस नियुक्त करून मतदार नावनोंदणीचा कार्यक्रम राबवावा. मतदार नावनोंदणीमध्ये ऑनलाईन पध्दतीत येत असलेले अडथळे पाहता समस्येचे गांभीर्य जाणून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी सौ. रूपाली किस्मत भगत यांनी केली आहे.