
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ मधील स्टेशन रोडवर उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांवर तातडीने कायमस्वरूपी कारवाई अभियान राबविण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी वाहतुक विभागाच्या उपायुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमध्ये महापालिका प्रभाग ८७ मधील स्टेशन रोडवर साईबाबा हॉटेल ते राजीव गांधी उड्डाणपुल आणि साईबाबा हॉटेल ते सहकार बाझार यादरम्यान बाराही महिने २४ तास अवजड वाहने उभी असलेली पहावयास मिळतात. या अवजड वाहनांच्या पार्किगमुळे वाहतुक कोंडी तर होतेच, पण या अवजड वाहनांच्या आडून पदपथावरून जाणाऱ्या रहीवाशांची लूटमारही केली जाते. दोनच दिवसापूर्वी अवजड वाहनांच्या आड लपून काही भामट्यांनी एका पुरूषाला भूल टाकून त्यांच्याकडील चैन व अंगठ्या चोरून नेल्या आहेत. याबाबत नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. स्टेशन रोडवर समविषम पार्किग असतानाही दोन्ही बाजूला अवजड वाहनांची पार्किग होत असते., वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याचे सौ. सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
अवजड वाहने पार्क होत असल्याने पदपथावर नेहमीच अंधार व कमी उजेड असतो. मुलींच्या छेडछाडीच्या घटनाही या अवजड वाहनांच्या आडून झालेल्या आहेत. तथापि समाजात आपल्या इज्जतीचा व प्रतिष्ठेचा ब्रभा होवू नये म्हणून संबंधित मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे. ही वाहने हटविल्यास तसेच उभ्या केल्या जाणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्किगवर सतत कारवाई अभियान राबविल्यास वाहतुक कोंडी होणार नाही. महिलांची व मुलींच्या छेडछाडीच्या घटनाही होणार नाहीत. वाटमार व लुटमारीच्या घटनांना पायबंद बसेल. भविष्यात अवजड वाहनांच्या आडून एकट्या जाणाऱ्या महिलेच्या अथवा मुलीच्या बाबतीत व्याभिचाराची घटना घडल्यास त्यास कोण जबाबदार असणार? भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवून लोकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची भीती आहे. अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे व संबंधित वाहनांवर नियमितपणे कारवाई अभियान राबविण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.